प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ; जवळपास 5 हजार विद्यार्थ्यांना दिलासा
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत दूरशिक्षण विभागातील प्रथम वर्षाच्या ऑनलाईन शिक्षण केंद्राकडील सर्व अभ्यासक्रमांना नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी)कडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राकडील प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे, अशी माहिती केंद्राचे संचालक डॉ. डी. के. मोरे यांनी दिली.
युजीसीकडून मान्यता मिळालेल्या बी. ए., बी. कॉम., एम. ए. भाषा (इंग्रजी, हिंदी, मराठी), एम. ए. सामाजिकशास्त्रs (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र), एम. कॉम., एम. एस्सी. (गणित), एम. बी. ए या पदवी व पदव्युत्तर विषयांची शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन असून कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिहय़ातील 81 अभ्यास केंद्रांमध्ये विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, सैनिक, उद्योजक, शेतकरी, कामगार व बंदीजन आदी शिक्षणापासून वंचितांना प्रवेश घेता येईल. विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर Distance Education या लिंकवर प्रवेशाबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. एमबीएसाठीची प्रवेशप्रक्रिया यापूर्वीच झाली असून पात्र उमेदवारांना लवकरच प्रवेश दिला जाईल. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी स्वतःचा युजर आयडी व पासवर्ड तयार करुन नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यार्थ्याने निवडलेले अभ्यासकेंद्र हेच शक्यतो परीक्षा केंद्र म्हणून दिले जाते. प्रथम वर्षाचा ऑनलाइन अर्ज नव्याने सादर करताना ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यानी बॅंकेची कागदपत्रे (पासबुक, डेबिट/क्रेडिट कार्ड, युपीआय/ खाते क्रमांक/ आयएफएससी कोड इ.) सोबत ठेवावी. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत अभ्यासकेंद्रावर शुल्कासह जमा करण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे.
प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना संधीः कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या सर्व अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे व्यवसाय, नोकरी व अन्य कारणांमुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्यांना प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. तरी जास्तीत जघ्स्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले आहे.
विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राची वैशिष्टय़े
12 प्रोग्राम्स अंतर्गत विविध अभ्यासक्रम. दर्जेदार स्वयंअध्ययन साहित्य उपलब्ध. 2 विभागीय केंद्रे, 81 अभ्यासकेंद्रे, दुर्गम भागांचाही समावेश. अभ्यासकेंद्रांमध्ये संपर्कसत्रांचे आयोजन. विद्यार्थ्यांना विषयतज्ञांचे विशेष मार्गदर्शन. ऑनलाईन व्हिडिओ मार्गदर्शन सत्रांचाही समावेश. विद्यार्थ्यांना नेट/सेट तसेच स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन.