अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण ः स्वस्त पेमेंट पर्यायाला प्रोत्साहन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसात केंद्र सरकार युपीआय पेमेंटवर शुल्क आकारणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, अर्थ मंत्रालयाने या चर्चेला पूर्णविराम दिला असून युपीआय व्यवहार पूर्वीप्रमाणेच मोफत म्हणजेच विनाशुल्क राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अर्थ मंत्रालयाने ट्विट करून यासंबंधीची माहिती जारी केल्याने युपीआय वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘युपीआय’देखील ‘आयएमपीएस’प्रमाणे निधी हस्तांतरित करत असल्यामुळे युपीआय व्यवहारांसाठीही ‘आयएमपीएस’प्रमाणेच निधी हस्तांतरण व्यवहार शुल्क असणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव आरबीआयने सरकारला सादर केल्याचे बोलले जात होते. मात्र, आता युपीआय व्यवहार पूर्वीप्रमाणेच मोफत राहतील’ असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. ‘युपीआय’ लोकांसाठी अतिशय सोयीस्कर आहे. अर्थव्यवस्थेसाठीही ते फायदेशीर आहे. ‘युपीआय’ सेवेवर शुल्क आकारण्याबाबत सरकारमध्ये सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही. सध्या सेवा पुरविणाऱयांच्या खर्चाच्या वसुलीचा प्रश्न इतर माध्यमातून पूर्ण केला जाईल. सरकार डिजिटल पेमेंट इकोसिस्टमसाठी आर्थिक सहाय्य देत राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
युपीआय व्यवहार ‘एनपीसीआय’ अंतर्गत
काही दिवसांपूर्वी आरबीआयने युपीआय पेमेंट आणि शुल्काबाबत लोकांकडून फीडबॅक मागवला होता. यासाठी सल्लापत्रही शेअर करण्यात आल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. भारतातील आरटीजीएस आणि एनईएफटी पेमेंट सिस्टमचे व्यवहार आरबीआयच्या अंतर्गत येतात. तर, आयएमपीएस, रुपे, युपीआयसारख्या प्रणाली नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (एनपीसीआय) द्वारे हाताळल्या जात आहेत. सरकारने 1 जानेवारी 2020 पासून युपीआय व्यवहारांसाठी शून्य-शुल्क प्रेमवर्क अनिवार्य केले आहे.
असंख्य ग्राहकांची ‘युपीआय’ला पसंती
2016 मध्ये युपीआय लाँच झाल्यानंतर डिजिटल पेमेंटच्या जगात एक क्रांती झाली. युपीआयने थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा दिली. पूर्वी डिजिटल वॉलेटचा टेंड होता. डिजिटल वॉलेटमध्ये केवायसीची प्रक्रिया असल्यामुळे अनेक ग्राहकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. त्या तुलनेत युपीआय व्यवहार सोयीस्कर ठरत असल्यामुळे अनेक ग्राहकांची त्याला पसंती असते.
जुलैमध्ये 600 कोटींचे व्यवहार
‘एनपीसीआय’च्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये युपीआयद्वारे 600 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. याचे व्यवहारमूल्य 10.2 लाख कोटी रुपये होते. युपीआय व्यवहारांमध्ये महिना-दर-महिना 7.16 टक्के वाढ होत आहे. व्यवहार मूल्य दरवषी 4.76 टक्के दराने वाढत आहे.
‘युपीआय’ व्यवहार…
@ युपीआय प्रणाली रिअल टाईम फंड ट्रान्सफर करते. एका ऍप्लिकेशनमध्ये अनेक बँक खाती लिंक केली जाऊ शकतात.
@ एखाद्याला पैसे पाठवण्यासाठी ग्राहकाला फक्त त्यांचा मोबाईल नंबर, खाते क्रमांक किंवा युपीआय आयडी आवश्यक.
@ ‘आयएमपीएस’च्या मॉडेलवर युपीआय विकसित करण्यात आल्यामुळे ग्राहक ऍपद्वारे 24ƒ7 बँकिंग करू शकतात.
@ युपीआय ऑनलाईन व्यवहारांसाठी ओटीपी, सीव्हीव्ही कोड, कार्ड नंबर, एक्स्पायरी डेट इत्यादींची आवश्यकता नसते.