प्रतिनिधी/ बेळगाव
रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी मराठा मंदिर येथे उत्सव सखी आयोजित शेवटचा ‘फेम फिएस्टा’ होणार आहे. त्यानिमित्त हा आढावा…
महिला उत्तम व्यवस्थापक असतात. अलीकडे अभ्यासक्रमांमध्ये व्यवस्थापन हा विषय महत्त्वाचा ठरला आहे. परंतु प्रत्यक्षात व्यवस्थापनाचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे महिला करत असलेले व्यवस्थापन होय. एकाच वेळी अनेक कामे करणे आणि घर व नोकरी अथवा व्यवसाय दोन्ही आघाड्यांवर यशस्वी होणे हे त्यांना सहज जमते. अलीकडे तर महिला उद्योग क्षेत्रामध्ये बहुसंख्येने पुढे येत आहेत.
महिलांनो उद्योजक व्हा, अशी हाक सरकारही देत आहे. त्यांच्यासाठी अनेक योजनाही आहेत. मात्र 15 वर्षांपूर्वी महिलांनी उद्योजकतेकडे वळावे, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या हेतूने डॉ. अनुपमा जोशी यांनी ‘फेम फिएस्टा’ हा उत्सव केवळ महिलांसाठी सुरू केला. या उत्सवाने अनेक महिलांना व्यासपीठ तर दिलेच, परंतु त्यांच्यातील उद्योजकतेचे बीजही येथेच रोवले गेले.
साधारण 2008 चा काळ लक्षात घेता महिलांसाठी बेळगावमध्ये फारशा संधी उपलब्ध नव्हत्या. अशा वेळी अनुपमा यांनी फेम फिएस्टा सुरू केला. गृहोद्योग किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलांना त्यांनी स्टॉल दिले. तेव्हा स्टॉलचे भाडे अवघे 300 रुपये होते. महिला येतील की नाही? असा संभ्रम असताना या पहिल्याच उत्सवाला इतका प्रतिसाद मिळाला की महिलांची गर्दी लक्षात घेऊन मिलेनियम गार्डनचे (कै.) डी. टी. देसाई यांनी लॉन खुले करून दिले.
पहिल्या वर्षी फक्त प्रदर्शन झाले. परंतु महिलांच्या कलागुणांनाही वाव मिळावा असा विचार पुढे आला आणि नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांचे अवघे विश्व त्यांच्या मुलांभोवती केंद्रित असते. म्हणून मुलांसाठीसुद्धा स्पर्धा सुरू झाल्या. हळुहळू पाककला, केशरचना, पुष्परचना, रांगोळी, समूह नृत्य अशा स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आणि महिलांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. फेम फिएस्टा महिलांवर केंद्रित असल्याने आणि असंख्य महिला या व्यासपीठावर एकत्र आल्याने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्याचे ठरले आणि दरवर्षी हा उपक्रम सुरू राहिला.
फेम फिएस्टाच्या अनुभवाबद्दल अनुपमा जोशी म्हणतात, महिलांनी हा उत्सव स्वत:चा मानला. एका वर्षी मार्चमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि मैदानात पाणी साचले, स्टॉलचे छत उडाले. आता उत्सव होणार नाही म्हणून आपण पैसे परत करण्याच्या हेतूने उत्सवाच्या ठिकाणी गेले असता महिलांनी आपण उत्सव करायचाच असा निर्धार व्यक्त केला. तेथेच मीEिटग घेतली व उत्सव सुरू झाला. पुन्हा पाऊस आला, परंतु महिलांनी आतल्या बाजूला जेथे निवारा होता तेथे टेबल लावून विक्री सुरू केली. परीक्षक आणि प्रेक्षकांनी छत्री धरून नृत्य स्पर्धांचा आस्वाद घेतला. महिलांची ही सांघिकता आणि पाठिंबा मला बळ देऊन गेला आहे.