चेन्नई \ ऑनलाईन टीम
द्रमुक मुन्नेत्र कळघम पक्षाचे प्रमुख एम के स्टॅलिन यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी स्टॅलिन यांना शपथ दिली. या कार्यक्रमाला स्टॅलिन यांच्या पत्नी दुर्गा स्टॅलिनही उपस्थित होत्या. एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना ‘मी मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन..’असे शब्द उच्चारताच दुर्गा स्टालिन यांना अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खऱे तर भावूक करणारा आहे. आपल्या पतीला यशाच्या शिखरावर पाहणे हे कोणत्याही पत्नीसाठी अभिमानास्पदच असते. पत्नी म्हणून ती चांगल्या वाईट प्रसंगात नेहमीच त्याच्यासोबत असते. त्याचे प्रत्येक स्वप्न ती त्याच्यासोबत जगलेली असते. पती एम के स्टॅलिन यांना शपथ घेताना पाहून दुर्गा स्टॅलिन यांचा ऊर अभिमानाने भरून आला आणि त्या देखील भावूक झाल्या.
स्टॅलिन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना आपलं पूर्ण नाव ‘मुखुवेल करुणानिधी स्टॅलिन’असं घेतलं. त्यावेळी राजभवनात टाळ्यांचा एकच आवाज घुमला. तर दुसरीकडे स्टॅलिन यांच्या पत्नी दुर्गा स्टॅलिन आणि मुलगा उधैनिधी स्टॅलिन यांना अश्रू अनावर झाले. राजभवनातील टाळ्यांचा आवाज आणि दुर्गा स्टॅलिन यांच्या डोळ्यातील अश्रू …हा क्षण प्रत्येकाला भावूक केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच सोशल मीडियवर देखील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळात आता 34 सदस्य असून यामध्ये 15 नवे चेहरे आहेत. केवळ 2 महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. स्टॅलिन यांनी गृह मंत्रालय स्वत:कडेच ठेवले आहे. द्रमुक पक्षाचे माजी अध्यक्ष करुणानिधी यांच्या अनुपस्थितीमध्ये झालेल्या पहिल्याच विधानभा निवडणुकीत स्टॅलिन यांनी बाजी मारली आहे. ते पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले आहेत.
स्टॅलिन यांचं पूर्ण नाव मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन आहे. सोव्हिएत संघ युनियनचे प्रसिद्ध नेते जोसेफ स्टॅलिन यांच्या नावावरुन एम. के. यांच्या नावामागे स्टॅलिन लावण्यात आलं. करुणानिधी यांनी स्टॅलिन यांना आपला उत्तराधिकारी घोषित केलं होतं. त्यानंतर त्यांना आपला भाऊ अलागिरी यांच्याशी सत्तासंघर्ष करावा लागला होता. करुणानिधी यांच्या निधनानंतर ऑगस्ट 2018मध्ये स्टालिन यांची द्रमुक मुन्नेत्र कळघमच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.