आपल्या विरोधात पोक्सो कायद्याचा गैरवापर केला जात असून केंद्रातील सक्षम नेर्तृत्वाखाली ‘आम्ही सरकारला ते बदलण्यास भाग पाडू’ असा विश्वास भारतीय कुस्तीगीर परिषदेचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केला आहे. अल्पवयीन मुलींसह अनेक महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मुलांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा आणि इतर संबंधित कायद्यांतर्गत दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “देशात पोस्को कायद्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असून शासनातील अधिकारीसुद्धा याच्या गैरवापराला बळी पडले आहेत. त्यामुळे केंद्रातील सक्षम नेर्तृत्वाखाली आम्ही सरकारला पोक्सो (POCSO) कायदा बदलण्यास भाग पाडू. काँग्रेस सरकारने हा कायदा त्याच्या विविध पैलूंची तपासणी न करता आणला होता. त्यामुळे त्याच्या गैरवापर वाढला आहे.” असे ते म्हणाले.
महिला कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि ऑलिम्पियन बजरंग पुनिया यांच्यासह देशातील अनेक अव्वल कुस्तीपटू, 23 एप्रिलपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर निदर्शने करत आहेत. इतर महिला कुस्तीपटूंचा ब्रिजभुषण सिंग यांनी लैंगिक छळ केल्याचा दावा करून सिंगच्या अटकेची मागणी त्यांनी उचलून धरली आहे.