सद्र यांचे समर्थक राष्ट्रपती भवनात घुसले ः सुरक्षादलांच्या गोळीबारात 20 ठार
वृत्तसंस्था/ बगदाद
श्रीलंकेप्रमाणेच इराकमधील स्थिती अराजक झाली आहे. राजकीय अडथळे दूर न झाल्याने नाराज शिया धर्मगुरु मुक्तदा अल-सद्र यांनी सोमवारी राजकारणाला रामराम ठोकण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सैन्याने संचारबंदी लागू केली असली तरीही अल-सद्र यांचे समर्थक रस्त्यांवर उतरले आहेत. यादरम्यान सुरक्षा दल आणि निदर्शकांदरम्यान हिंसक झटापट झाली आहे.
सद्र यांच्या हजारो समर्थकांनी राष्ट्रपती भवनावर चाल केली आहे. सुरक्षा दलांनी या जमावाला रोखण्यासाठी प्रथम अश्रूधूराचा वापर केला आणि मग गोळीबार केला. या गोळीबारात 20 जणांना जीव गमवावा लागला तर 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत. शिया धर्मगुरु मुक्तदा अल-सद्र यांनी हिंसा अन् शस्त्रास्त्रांचा वापर बंद होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.
सद्र यांचे समर्थक राष्ट्रपती भवनातील जलतरण तलावात दिसून आले ओत. सद्र यांच्या समर्थकांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. त्यांचे समर्थक राष्ट्रपती भवनातील विविध ठिकाणी फिरत असल्याचे दर्शविणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अल-सद्र समर्थक आणि त्यांचे राजकीय विरोधक इराणचे समर्थनप्राप्त शिया समूह यांच्यात दीर्घकाळापासून राजकीय तणावाची स्थिती आहे.
धर्मगुरु मुक्तदा अल-सद्र यांच्या पक्षाने मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, परंतु बहुमत मिळविता आले नव्हते. सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्यासाठी इराणचे समर्थन प्राप्त गटांसोबत चर्चा करण्यास सद्र यांनी नकार दिला होता. यापूर्वी देखील अल-सद्र यांच्या समर्थकांनी जुलैमध्ये सरकार स्थापना रोखण्यासाठी संसदेत धाव घेतली होती. त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला आहे.
इराकमध्ये ऑक्टोबर 2021 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत अल-सद्र यांच्या पक्षाने 329 पैकी 73 जागा जिंकल्या होत्या. संसदेत मोठा पक्ष ठरूनही सद्र यांना सरकार स्थापन करता आले नव्हते. 2016 मध्ये देखील अल-सद्र यांच्या समर्थकांनी संसदेच्या दिशेने कूच केली होती.
संयुक्त राष्ट्रसंघाकडून शांततेचे आवाहन
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव ऍण्टोनियो गुतेरेस यांनी इराकमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांवर चिंता व्यक्त केली आहे. जनतेने संयम बाळगावा तसेच संबंधित अधिकाऱयांनी हिंसा रोखण्यासाठी त्वरित पावले उचलावीत असे आवाहन त्यांनी केले आहे.