त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री ः हल्ल्यात काही जण जखमी
वृत्तसंस्था/ अगरतळा
त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांच्या निवासस्थानावर मंगळवारी रात्री उशिरा अज्ञात गुंडांनी हल्ला केला आहे. देव यांच्या उदयपूर येथील निवासस्थानावर पुजाऱयांचा एक समूह धार्मिक विधीसाठी पोहोचला होता. या हल्ल्यात हे पुजारी जखमी झाले आहेत. हा हल्ला माकपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.
हल्लेखोरांनी पुजाऱयांच्या वाहनांची तोडफोड केली. परिसरातील लोकांनी या पुजाऱयांना वाचविण्यासाठी धाव घेतल्यावर हल्लेखोरांनी पळ काढला आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर स्थानिक लोकांनी निदर्शने केली आहेत. याचदरम्यान निदर्शकांनी कथित हल्लेखोरांच्या दुकानांची तोडफोड केल्याने मोठा बंदोबस्त ठेवावा लागला आहे. स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
विप्लव देव हे सध्या राज्यसभा खासदार आहेत. विप्लव देव हे यापूर्वी त्रिपुराचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या जागी माणिक साहा यांनी 15 मे 2022 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. देव हे एप्रिल 2028 पर्यंत राज्यसभा खासदार असणार आहेत.