प्रतिनिधी/गडहिंग्लज
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्यासाठी 6 नोव्हेंबरला मतदान होणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. जिल्हा निबंधक प्रकाश जगताप यांनी ही माहिती दिली. पावसाच्या कारणाने 15 जुलै रोजी अर्ज भरण्याची प्रक्रीया झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम थांबवण्यात आला होता.
गडहिंग्लज साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतरही कोरोनाच्या कारणाने संचालक मंडळाला मुदत वाढ देण्यात आली होती. दरम्यानच्या कालावधीत 12 संचालकांनी राजीनामा दिल्याने शासनाने कारखान्यावर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती. त्यानंतर कारखान्याचा 19 जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता. त्यानुसार 15 ऑगष्टला मतदान होणार होते. 15 जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. या मुदतीत 223 उमेदवारांनी 263 अर्ज भरले होते. त्यानंतर पावसाच्या कारणावरून शासनाने संपूर्ण निवडणूक प्रक्रीया 30 सप्टेंबर पर्यंत थांबवण्यात आली होती. आज पुन्हा निवडणूक प्रक्रिया पुढे सुरु करण्यात आली. 11 ऑक्टोबरला अर्जांची छाननी तर 12 ते 27 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. 28 ऑक्टोबरला चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. 6 नोव्हेंबरला मतदान तर 8 नोव्हेंबरला मतमोजणी होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्याने पुन्हा राजकीय हालचाली वेगावल्या आहेत.
हे ही वाचा : गडहिंग्लज साखर कारखान्यासाठी ६ नोव्हेंबरला मतदान