प्रतिनिधी / बेळगाव
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने उच्चतम कामगिरी करत देशातील टॉप-50 अभियांत्रिकी संस्थांमध्ये स्थान मिळविले आहे. राष्ट्रीय स्तरावर झालेल्या एनआयआरएफ रँकिंग-2022 अंतर्गत व्हिटीयुने 49 वा क्रमांक पटकाविला आहे. देशातील आयआयटी, आयआयआयटी, एनआयटीसह अन्य तांत्रिक संस्थांचा व विद्यापीठांचा यामध्ये सहभाग होता.
त्याचप्रमाणे देशातील तांत्रिक व अतांत्रिक विद्यापीठांच्या यादीत व्हिटीयुने 72 वा क्रमांक मिळविला आहे. यामुळे व्हिटीयुने इलाईट क्लब ऑफ टॉप-100 मध्ये प्रवेश मिळविला आहे. शिक्षण मंत्रालय व नामांकन देणाऱया राष्ट्रीय संस्था अत्यंत काटेकोरपणे शिक्षण, अध्यापन, मनुष्यबळ, संशोधन, व्यावसायिकता आणि कर्तृत्वाचा ठसा अशा निकषांवर हे नामांकन देते.
या यशाबद्दल कुलगुरू प्रा. करिसिद्धप्पा यांनी आनंद व्यक्त करत सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे सुवर्णमहोत्सवी वर्षात हे यश मिळविल्याबद्दल अभिनंदन केले आहे.