वार्ताहर /शिवोली
संततधार पडणाऱया पावसामुळे शिवोली परिसर जलमय झाला. शिवोली येथील मासळी मार्केटातील दुकानात पावसाळय़ाचे पाणी गेल्याने दुकाने बंद ठेवावी लागली.
रविवारी पावसाने उसंत घेतल्याने येथील नागरिकांनी आपली घरे दुरुस्त करण्याची कामे हाती घेतली. सोमवारी संपूर्ण गोव्यासह शिवोलीत अंदाजे सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. याच परिस्थितीत पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत सोडले. सतत दोन तास पाऊस पडल्याने येथील रस्ते पाण्याखाली गेले होते. तसेच गटारे भरुन वाहू लागल्याने येथील काही दुकानात पाणी गेले. परिणामी मालकांना दुकाने बंद ठेवावी लागली.
मासळी मार्केटात शुकशुकाट
रविवारी पावसाने उसंत घेतल्याने येथील मासळी मार्केटात गर्दी होती. दर सोमवारीसुद्धा मासळी मार्केटात लोकांची वरदळ असते. परंतु सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे येथील मासळी मार्केटात शुकशुकाट होता.
गटारे न उसपल्याने पाणी रस्त्यावर
मार्ना-शिवोली पंचायतीतील काही भागातील गटारे उसपली होती. त्यामुळे पावसाचे पाणी सुरळीत वाहत होते. येथील ‘युनीयन बँक’ समोरील गटार न उसपल्याने पाणी रस्त्यावरुन वाहत होते. त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालविणे मुश्कील होते. एखादी गाडी जर वेगाने या रस्त्यावरुन गेली तर ते पाणी येथील दुकानात उडत होते. त्यामुळे वाहनचालक व दुकान मालकांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे.
दरवर्षी हाच प्रकार : संजय मोये
दरवर्षी पाऊस पडला की ‘युनियन बँक समोरील गटारात तुंबते. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुर्लक्ष तर होतेच शिवाय मार्ना-शिवोली पंचायत मंडळसुद्धा सगळे बघून न बघितल्यासारखे करते. तुंबलेले गटार पावसाळय़ात उसपले असते तर आमच्या दुकानात पाणी गेले नसते. याला जबाबदार कोण? असा प्रतिसवाल दुकानदार संजय मोये यांनी केला व लवकरात लवकर गटार उपसण्याचे कार्य हाती घ्यावे असे आवाहन त्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केले.
शिवोली परिसर जलमय
दरम्यान सोमवारी पडलेल्या संततधार पावसाने शिवोली परिसर जलमय झाला. थिएटर जंक्शन, ‘एचडीएफसी’ बँकेडील नाका, श्री वसंत विद्यालयाकडे जाणारा रस्ता, तसेच अनेक रस्ते पावसाच्या पाण्यामुळे रस्त्या खाली गेले होते. मार्ना-शिवोली व सडये-शिवोली पंचायतीनां जोडणारा ‘होली क्रॉस’ शाळेच्या मागचा रस्ता संपूर्ण पाण्याखाली गेला होता. त्यामुळे वाहनचालक त्यातून वाट काढताना दिसून येत होते. तसेच रत्यांवर पाणी भरुन राहिल्याने वाहनचालकांना वाहन चालविणे मुश्कील होत होते. ‘एचडीएफसी’ बँकेसमोरील गटारांवर लाद्या बसविल्या नसल्याने गाडय़ा गटारात पडल्याचे वृत्त आहे.