मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊंकडून प्रशंसा : भाजप मित्रपक्षांनी, कारखानदारांनीही केले जोरदार स्वागत
प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल बुधवारी लोकसभेत देशाचा अर्थसकंल्प सादर केल्यानंतर त्यावर सरकारातील मंत्री, लोकप्रतिनिधी, सत्ताधारी भाजप व मित्रपक्षाचे पदाधिकारी त्याचबरोबर औद्योगिक, आर्थिक क्षेत्रातून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. सत्ताधाऱ्यांकडून तसेच उद्योगजगतातून या अर्थसंकल्पाचे जोरदार स्वागत करण्यात आले तर विरोधकांनी त्यावर खरमरीत टीका केली.गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राल्फ डिसोझा यांनी सर्वोत्कृष्ठ अर्थसंकल्प म्हटले आहे. अर्थसंकल्पात कर्नाटकला सढळहस्ते सवलती, निधी, योजनांचा वर्षाव करण्यात आला असून गोव्याला मात्र ठेंगा दाखविण्यात आला, अशी टीका विरोधकांनी केली आहे.
अर्थसंकल्पाचे जोरदार स्वागत : श्रीपाद नाईक

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी अर्थसंकल्पाचे जोरदार स्वागत केले आहे. हा अर्थसंकल्प कृषी, मासेमारी, सहकार, आदी क्षेत्रांवर जोर देणारा असून सर्वसामान्य माणसांचे हित जपणारा आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय पर्यटन, शिपिंग आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पात पगारदार, मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांवर जास्त भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेवर केंद्रीत असा हा अर्थसंकल्प असून त्याचे आपण स्वागत करतो, असे नाईक यांनी म्हटले आहे.
लोककल्याणकारी अर्थसंकल्प : तानावडे

भारताचा अमृत कालचा पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प हा लोककल्याणाबरोबरच भारताला ’सुपर इकॉनॉमिक पॉवर’ बनवणारा ठरेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केला आहे. हा अर्थसंकल्प प्रत्येक भारतीयाच्या जीवनाला स्पर्श करणारा असून त्यामुळे सामाजिक न्याय, समतेला चालना मिळेल, तसेच समाजातील सर्व घटकांना समान संधी प्राप्त होतील, असे सांगून तानावडे यांनी गोवा भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानले आहेत, तसेच केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. हा अर्थसंकल्प ग्रामीण लोकांचे जीवन सशक्त आणि उन्नत करणारा आहे. दलित, आदिवासी, शेतकरी, मागास आणि शोषित वर्ग, वेगळ्या पद्धतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना दिलासा देणारा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे करदात्यांना आणखी दिलासा मिळणार असल्याचे तानावडे यांनी म्हटले आहे.
’अमृत काल’च्या दिशेने वाटचालीचा अर्थसंकल्प : ढवळीकर

कित्येक वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून भारताला ’अमृत काल’च्या दिशेने घेऊन जाणारा असा अर्थसंकल्प आहे, असे मत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प बनवताना सर्वसामान्यांचे हित तर पाहिले आहेच. त्याशिवाय गरीब जनतेला देखील अनेक योजना देण्यात आल्या आहेत. प्रथमच मध्यमर्गींयाना आयकरात सूट मिळाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. सर्वस्पर्शी असा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प अमृत भारत च्या दिशेने वाटचाल करणारा आहे.
क्रांतीकारी अर्थसंकल्प : श्रीनिवास धेंपो

अर्थमंत्री निर्मला सीतारामान यांनी मांडलेला यंदाचा अर्थसंकल्प हा देशाच्या सकारात्मक व सशक्त असून देशाच्या प्रगतीत मोठे योगदान देणारा आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास धेंपो यांनी व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प क्रांतीकारी असून पायाभूत सुविधा, शिक्षण, हरित उर्जा आणि कृषी क्षेत्रासाठी भविष्याचा वेध घेणारा ठरणार आहे, असे धेंपो यांनी पुढे म्हटले आहे.
धनाढ्या मित्रांसाठीचा अर्थसंकल्प : युरी आलेमाव

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्प हा भाजपने आपल्या श्रीमंत आणि धनाढ्या मित्रांचे हित साधण्यासाठी बनविलेला ’मित्र काल’ अर्थसंकल्प आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. अर्थसंकल्पात गरिबांसाठी आणि बेरोजगार तऊणांसाठी काहीही नाही. एवढेच नव्हे तर महागाई नियंत्रित करण्यासाठीही कोणत्याही उपाययोजना नाहीत. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीवर डोळा ठेवून केंद्र सरकारने कर्नाटकला पेयजल आणि सिंचनासाठी 5300 कोटी दिले. यातून गोव्याला सावत्रपणाची वागणूक मिळते. गोवा मुक्तीच्या 60व्या वर्षी गोव्याला 300 कोटी देण्याचे आश्वासन दिले होते, अखेरीस केवळ 150 कोटी मिळाले. केंद्राला गोमंतकीयांची काळजी असती तर त्यांनी धरणे बांधण्यासाठी निधी दिला असता, असे आलेमाव यांनी पुढे म्हटले आहे.
’आत्मनिर्भर भारत’ ला चालना मिळेल : नवीन दैवज्ञ
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला ‘अमृत काल’ चा पहिला अर्थसंकल्प भविष्यवादी, विकासाभिमुख आहे. त्याने भारताचा मजबूत पाया घातला आहे. अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले असल्याने आत्मनिर्भर भारत व्हिजनला चालना देत समाजातील प्रत्येक घटकाला फायदा होईल, असा विश्वास प्रसिद्ध चाडर्ट अकाऊंटंट नवीन दैवज्ञ यांनी व्यक्त केला आहे. सर्वसमावेशक विकास, अंत्योदय टप्प्यापर्यंत पोहोचणे, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, भारताची क्षमता उघड करणे, हरित विकास, युवा शक्तीवर बँकिंग आणि वित्त क्षेत्राला चालना देणे, हे अर्थसंकल्पातील सात प्राधान्यक्रम देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेतील, असेही दैवज्ञ यांनी म्हटले आहे.
तंत्रज्ञानाधारित अर्थसंकल्प : दामोदर कोचकर
हा सर्वसमावेशक आणि तंत्रज्ञानावर आधारित अर्थसंकल्प आहे, असे मत गोवा लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी कोविड काळात एमएसएमईंना मोठा दिलासा देत अर्थमंत्र्यांनी पत हमी योजनेसाठी 9000 कोटी ऊपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एमएसएमईला 2 लाख कोटी कर्जासाठी विशेष सुरक्षा सक्षम करेल, तसेच संकटग्रस्त आणि निधीची कमतरता असलेल्या एमएसएमई क्षेत्रासाठी निधी प्रवाह वाढवेल. त्याचबरोबर पगारदारवर्ग व पेन्शनधारकांना करप्रणालीत भरीव सवलत देऊन अर्थसंकल्पाने समाजातील सर्व घटकांना स्पर्श केला आहे, असे कोचकर यांनी पुढे म्हटले आहे.
अर्थसंकल्प सर्वोत्कृष्ट : राल्फ डिसोझा
हा अर्थसंकल्प सर्वोत्कृष्ट असून देशी पर्यटन वाढीस त्यामुळे मोठा हातभार लागणार आहे. निर्यात कर कमी केल्याने उद्योगांना मोठा लाभ होणार असून गोवा राज्याला अर्थसंकल्पाचा चांगला फायदा मिळणार असल्याची माहिती गोवा चेंबर्सचे अध्यक्ष राल्फ डिसोझा यांनी दिली.
गोव्यासाठी काहीच नाही : गोवा फॉरवर्ड
विद्यमान गोवा सरकारच्या प्रचंड आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे आधीच मोठ्या वित्तीय तुटीचा सामना करावा लागत असतानाच त्यात भर घालण्यासाठी या अर्थसंकल्पात परिणामकारक असे काहीच दिलेले नाही, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प गोव्यासाठी निराशाजनक ठरला असून डबल इंजिन सरकार गोमंतकीयांना दिलासा देण्यात स्पष्टपणे अपयशी ठरले आहे. प्रचार आणि मोठमोठी आश्वासने याशिवाय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे कोणतेही अधिकार नाहीत हे नि:संशय सिद्ध झाले आहे. म्हणुनच गोव्याला काय हवे आहे, गोवेकरांना काय हवे ते मागून घेण्यात ते अपयशी ठरले आहेत, असे फॉरवर्डने म्हटले आहे.
संधीसाधू अर्थसंकल्प : टीएमसी
हा अर्थसंकल्प भविष्यकालीन नव्हे तर संधीसाधू व गरीबविरोधी अर्थसंकल्प आहे, अशी टीका तृणमूल काँग्रेस पक्षाने केली आहे. या अर्थसंकल्पात आशेचा कोणताही किरण दिसत नाही, केवळ अंधार दिसत आहे, असे तृणमूलने म्हटले आहे. पक्षाचे मीडिया समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना हा अर्थसंकल्प गरीबांच्या विरोधी असल्याचे म्हटले आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. महागाई वाढत आहे. अशावेळी आयकरात सूट देऊन अर्थमंत्र्यांना काय साध्य करायचे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अर्थसंकल्पात बेरोजगारांसाठी कोणताही प्रस्ताव नाही, असेही डिमेलो यांनी म्हटले आहे.
अर्थसंकल्पात गोव्याला ठेंगा : आप
केंद्राने आधी कर्नाटकाला गोव्याची नदी दिली आणि आता 5300 कोटी ऊपये एवढा प्रचंड निधी दिला. यावरून केंद्रात गोव्याला किती मान आहे तेच दिसून येते. या अर्थसंकल्पात सर्व स्तरांवर गोव्याला ठेंगाच दाखविण्यात आला आहे. अशी परखड प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड अमित पालेकर यांनी व्यक्त केली आहे. शिक्षण, आरोग्य, या सर्वच क्षेत्रात गोव्यावर अन्याय करण्यात आला असून कर्नाटकला मात्र ’गोल्डन गिफ्ट’ दिले आहे, असे पालेकर यांनी पुढे म्हटले आहे.
अर्थमंत्र्यांना गोव्याचा पूर्ण विसर : चोडणकर
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गोव्यासाठी कोणत्याही निधीची तरतूद न करता त्यांना गोव्याचा पूर्ण विसर पडल्याप्रमाणे वागणूक दिली आहे, त्याशिवाय आजारी पर्यटन आणि खाण उद्योगांकडे दुर्लक्ष केले आहे, अशी जोरदार टीका प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. केंद्राची ही वागणूक पाहता भाजपसाठी गोमंतकीय म्हणजे दुय्यम दर्जाचे सुद्धा नागरिक म्हणून मान नसल्याचे अर्थसंकल्पाने सिद्ध केले आहे. केंद्राकडून मदत न मिळाल्याने स्थानिक सरकार जनतेवर पाणी आणि वीजदराचा मोठा भार टाकत आहे. तसेच निर्यात क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देऊनही गोव्यातील फार्मा उद्योगाची अर्थसंकल्पाने पूर्णपणे निराशा केल्याचा दावाही चोडणकर यांनी केला आहे.
करसवलतीचे गाजर हा आणखी एक जुमला : शिरोडकर
केंद्रीय अर्थसंकल्पात करदात्यांना जे करसवलतीचे गाजर दाखविण्यात आले आहेत त्यांचा बारकाईने अभ्यास केल्यास भाजपचा हा आणखी एक मोठा जुमला असल्याचेच दिसून येते, अशी टीका अॅङ हृदयनाथ शिरोडकर यांनी केली आहे.
सात लाखपर्यंत करसवलत ही केवळ नवलक्षाधिशांसाठी असून जुन्यांच्या डोळ्यांना पाणी लावून त्यांची फसगत केली आहे, दावा शिरोडकर यांनी केला आहे.
पंतप्रधानांची ध्येयधोरणे साकारणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्प 2023-24 चे स्वागत केले असून तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्येयधोरणे साकार करण्यासाठी पोषक असल्याचे म्हटले आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे सबका साथ, सबका विकास – सबका विश्वास – सबका प्रयास या मोदींच्या कल्पनेला पुढे नेणारा असून तो जनताभिमुख असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की या अर्थसंकल्पात सर्वजणांना स्थान देण्यात आले असून तो सर्वसमावेशक असा आहे. नोकरदार, शेतकरी, महिला, युवकवर्ग, लहान मोठे व्यावसायिक उद्योजक अशा सर्वांना लाभ देणारा अर्थसंकल्प असून त्याचा फायदा स्थानिक उद्योगांना मिळणार आहे. या अर्थसंकल्पातून सौर उर्जा, अक्षय उर्जा, आणि त्यावरील उद्योग यांना प्राधान्य देण्यात आले असून त्याचा फायदा गोवा राज्याला मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले आणि अर्थमंत्री सितारामन यांचे अभिनंदन केले.