रविवारच्या बैठकीतून चित्र झाले स्पष्ट : कुणावरही अन्याय न करता उभारणी होणार,सांगेसाठी वरदानःमंत्री सुभाष फळदेसाई

प्रतिनिधी /सांगे
सांगे येथील श्रीसन प्लाझा सभागृहात काल रविवारी आयोजित बैठकीत सांगे-कोठार्ली येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाला सांगेतील जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला. केवळ काही प्रकल्पग्रस्त शेतकऱयांचा विरोध असल्याचे दिसून आले. एकूण चित्र पाहता नव्वद टक्के लोकांचा या प्रकल्पाला हिरवा कंदील असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. सांगेत आयआयटीचे स्वागत झाले आहे, यावर यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
कुणावरही अन्याय होऊ न देता प्रकल्पाची उभारणी केली जाईल. तसेच सांगेबाहेरील एखादा एनजीओ किंवा कुणीही विरोध केल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देताना, सांगेच्या विकासासाठी आयआयटी हे वरदान असल्याचे सांगेचे आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले.
हजारभर लोकांची उपस्थिती
सांगे तालुक्यात उगे पंचायत क्षेत्रात आयआयटी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असून त्यासंदर्भात जनतेची मते जाणून घेण्यासाठी या खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे एक हजार लोकांची उपस्थिती होती. उपस्थितांपैकी सुमारे नव्वद टक्के लोकांनी हात उंचावून नियोजित जागेतच आयआयटी व्हावी म्हणून समर्थन दिले, तर विरोध करणाऱयांची संख्या अत्यल्प होती.
अन्याय होऊ देणार नाही : फळदेसाई
सांगेतच आयआयटी व्हायला हवी. आपण आपल्या जाहीरनाम्यात जनतेला तसे वचन दिले होते. नियोजित जमीन ही सरकारच्या मालकीची असल्याने सर्व व्यवहार पारदर्शक पद्धतीने होणार आहेत. ज्या शेतकऱयांचे जमिनीसंदर्भात प्रश्न आहेत ते सोडविले जातील. त्यांना नुकसान भरपाई देण्याबरोबरच इतर सुविधा देऊ. आपण कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
…तर स्वखर्चाने पर्यायी जमिनी देणार
सरकारकडून जमिनीसंदर्भातील शेतकऱयांचे प्रश्न सोडविले जात नसतील, तर आपण स्वतः आपल्या खर्चाने लोकांना पर्यायी जमिनी देऊ. त्यासाठी स्वतः कागदोपत्री करार करू. ज्या शेतकऱयांच्या जमिनी जातील त्यांना वाऱयावर सोडले जाणार नाही, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले. आयआयटी हा शैक्षणिक प्रकल्प आहे. तो एखादा उद्योग नाही. त्यामुळे आपल्यावर विश्वास ठेऊन पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी विरोध करणाऱयांना केले. ज्या लोकांनी सरकारी जमीन बळकावलेली आहे त्यांनाही न्याय देऊ, असे फळदेसाई यांनी सांगितले.
चालून आलेल्या संधीचे सोने करूया
सांगे मतदारसंघ हा दुर्लक्षित, दुर्गम, अविकसित आहे. असे किती काळ चालणार. आयआयटीच्या रूपाने एक संधी चालून आली आहे, तिचे सोने करूया. दहा वर्षांनंतर सांगे येथील विद्यार्थी निश्चितच आयआयटीमध्ये शिक्षण घेताना आपणास पाहायला मिळेल, असे फळदेसाई म्हणाले. आयआयटीमुळे सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या साधनसुविधांची निर्मिती होऊन विकास होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोठय़ा विश्वासाने आपल्यावर आयआयटी सांगेत उभारण्याची जबाबदारी दिली आहे. या प्रकल्पासंदर्भात जे शेतकरी आणि जमीन उपभोगणाऱयाचे प्रश्न आहेत ते चर्चेतून सोडवुया. सांगेतील जनतेला आयआयटी पाहिजे, ही ताकद दाखवुया, असे ते म्हणाले. एखादी शक्ती विरोध करत असेल, तर तो प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा फळदेसाई यांनी याप्रसंगी दिला.
जैवविविधतेचे रक्षण करून उभारणी
आयआयटीचे प्राध्यापक राजेश प्रभुदेसाई यांनी प्रकल्पाविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले की, आयआयटी ही तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी संस्था आहे. तो उद्योग नाही. 2016 पासून गोव्यात फर्मागुडी येथे आयआयटीचे अभ्यासक्रम सुरू आहेत. सांगेमध्ये साधनसुविधा निर्माण करून ही संस्था कायमस्वरूपी स्थापन केली जाणार आहे. या ठिकाणच्या जैवविविधतेचा अहवाल तयार करून त्याचे रक्षण केले जाणार आहे. तसेच पर्यावरण सांभाळले जाणार आहे. स्थानिकांना यामुळे नोकऱया व व्यवसायाच्या संधी प्राप्त होणार आहेत. स्थानिक अर्थववस्था मजबूत होईल व साधनसुविधा वाढतील, असे त्यांनी सांगितले.
सांगेवासियांसाठी अभिमानाची गोष्ट
आयआयटीला मानाचे स्थान असून सांगेत आयआयटी साकार होणे ही सांगेवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या प्रकल्पामुळे हिरवळ नष्ट होणार नाही. त्यामुळे शेजारील शैक्षणिक संस्थांचाही विकास होऊन विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान आत्मसात करता येईल. पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही. तेव्हा ही सुवर्णसंधी दवडू नका, असे आवाहन प्रा. डॉ. नेहा करंजेकर यांनी केले.
आयआयटीला विरोध नको
प्रसाद नाईक यांनी चेन्नई येथील आयआयटी प्रकल्प किती इको-प्रेंडली आहे याचे उदाहरण देऊन सांगितले की, सांगेसाठी आयआयटी प्रकल्प भाग्याचा असून त्याला विरोध न करता मार्गी लावूया. सांगेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आयआयटी ही एक संधी आहे हे ओळखून पुढे जाण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. आयआयटीच्या माध्यमातून एसटी समाजातील मुलांना तंत्रज्ञानाचे ज्ञान दिले जाते व संशोधन, पीएच.डी. यासाठी लागणारी मदत पुरविली जाते. तसेच शेती विकासासाठी लागणारे संशोधन आणि तंत्रज्ञान पुरविले जाते, असे डॉ. शरद सिन्हा यांनी सांगितले.
आयआयटीचे रजिस्ट्रार वेंकट राव यांनी, तुम्ही आयआयटीसाठी जो पाठिंबा व्यक्त करत आहात तो पहिल्यास आयआयटीकडूनही तुम्हाला पुरेपूर सहकार्य मिळेल, असे लोकांना सांगितले. सर्वजण बरोबर गेल्यास सर्वांचाच विकास होईल, असे ते म्हणाले. यावेळी प्राचार्य शंकर विठोबा गावकर, सरयू सत्यवान नाईक, बायो भंडारी, माया जागली, विशाल गावकर, अलका फळदेसाई, सूर्या नाईक इत्यादींनी आयआयटी सांगेतच होणे गरजेचे असल्याचे सांगून पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
स्व. पर्रीकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल : गावकर
माजी आमदार वासुदेव गावकर यांनी आपला पक्ष तसेच मतभेद न पाहता सर्वांनी प्रकल्पाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. हा प्रकल्प सांगेमध्ये झाल्यास माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना ती खरी श्रद्धांजली ठरेल. संघटित होऊन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करूया. कुणावरही अन्याय होऊन हा प्रकल्प राबवायचा नाही, असे त्यांनी सांगितले. दिलीप दाबोलकर यांनी ज्या कुणाचे प्रश्न आहेत ते प्रथम सोडवून नंतरच पुढे जाण्याचे आवाहन केले. तसेच शेतीसाठी काय प्रयोजन आहे याची त्यांनी विचारपूस केली.
यावेळी व्यासपीठावर सांगेचे मामलेदार राजेश साखळकर, संकेश खोलकर, रिवण जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, डॉ. अभिरुद्ध आंबेकर, डॉ. राजेश प्रभुदेसाई, प्रा. नेहा करंजेकर इत्यादींची उपस्थिती होती. तसेच विविध पंचायतींचे माजी सरपंच, माजी उपसरपंच, माजी पंच, नगरसेवक इत्यादी हजर होते.
शेतकऱयांबरोबर बैठक
सुरुवातीला मंत्री फळदेसाई यांनी आपल्या कार्यालयात ज्या शेतकऱयांच्या जमिनी प्रकल्पासाठी जाणार आहेत त्यांच्याबरोबर बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध पर्याय दिले. पुन्हा बैठक होऊन यावर पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. त्यानंतर श्रीसन प्लाझा सभागृहात घेतलेल्या बैठकीला सांगे मतदारसंघातील जनतेचा चांगला प्रतिसाद लाभला. विरोध करणाऱयांचा एक गट देखील उपस्थित होता. सर्वांना बोलण्याची संधी दिली गेली. ‘आमका जाय, आमका जाय, आयआयटी आमका जाय’ अशा घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला.