ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीतील पक्षांनी शरद पवारांच्या नावाला पसंती दिली असून, काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यासंदर्भात पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. देशपातळीवर पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबद्दल घडामोडी सुरू असतानाच पवारांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी राष्ट्रपतीपदाच्या रेसमध्ये नसल्याचे स्पष्ट करत पवारांनी या विषयावर पडदा पडला आहे.
राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी उद्या विरोधकांची दिल्लीत बैठक होत आहे. या निवडणुकीत भाजपला तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी टीएमसीच्या ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांना डीएमके, टीएमसी, आप, शिवसेना आणि काँग्रेसने पसंती दर्शवली आहे. मात्र, पवारांनी आज पक्षाच्या कॅबिनेटच्या बैठकीत उमेदवारीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. मी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसून, या निवडणुकीत उमेदवार होणार नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले. पवारांच्या या भूमिकेमुळे विरोधी पक्षांममध्ये पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. निवडणुकीसाठी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. 18 जुलैला यासाठी मतदान होणार असून, 21 जुलैला नवीन राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा होणार आहे.