ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आरबीआयद्वारे काही ठराविक मूल्यांच्या चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्याऐवजी रवींद्रनाथ टागोर आणि दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे फोटो छापण्याचे प्रस्तावित असल्याचे वृत्त समाजमाध्यमांमधून समोर आले होते. मात्र, हे वृत्त निराधार असून, असा कोणताही प्रस्ताव बँकेच्या विचाराधीन नाही, असे स्पष्टीकरण RBI मुख्य व्यवस्थापक योगेश दयाल यांनी दिले. त्यानंतर यासंदर्भातील सर्व चर्चांवर पडदा पडला. मात्र, अनेकांनी प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे महात्मा गांधी चलनी नोटांवर केव्हा आले? आणि नोटांवरील तो फोटो नेमका कुठला आहे?
महात्मा गांधी चलनी नोटांवर केव्हा आले?
गांधीजी पहिल्यांदा 1969 मध्ये भारतीय चलनी नोटांवर आले. रिझर्व्ह बँकेने एक रुपयांची पहिली चलनी नोट महात्मा गांधींच्या शंभराव्या जयंतीनिमित्त फोटोसह प्रकाशित केली. महात्मा गांधी यांना सेवाग्राम आश्रमाच्या समोर बसलेलं दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर 18 वर्षानी महात्मा गांधींचं चित्र असलेली अजून एक नोट रिझर्व्ह बँकेने छापली. ऑक्टोबर 1987 मध्ये गांधीजींच्या चित्रासह 500 रुपयांची पहिली नोट चलनात आली. तेव्हापासून त्याचे हेच चित्र इतर चलनी नोटांवरही छापले गेले.
1987 मध्ये महात्मा गांधींचा फोटो वॉटरमार्कच्या स्वरुपात वापरला जात होता. तो नोटेच्या डाव्या बाजुला होता. मात्र त्यानंतर प्रत्येक नोटेवर गांधीजींचा फोटो छापला जातो. माहितीच्या अधिकारांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार, 1993 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटेच्या उजव्या बाजुला महात्मा गांधींचा फोटो छापण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.
दरम्यान, भारताच्या चलनातल्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो आहे. हा फोटो बदलून त्याजागी लक्ष्मी देवीचा फोटो छापावा, म्हणजे रुपयाची परिस्थिती सुधारेल असा सल्ला भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्यानंतर त्यावरून वादही निर्माण झाला होता.
गांधींचा हा फोटो कुठला आहे?
नोटांवर छापलेले महात्मा गांधींचे छायाचित्र हे 1946 मध्ये सध्याच्या राष्ट्रपती भवनातील व्हाईसराय हाऊसमध्ये काढण्यात आले होते. जेव्हा गांधीजी म्यानमार म्हणजेच तत्कालीन सचिव फ्रेडरिक पेथिक लॉरेन्स यांना भेटण्यासाठी गेले होते. फोटो कोणी काढला याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही. मात्र, नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या नवीन नोटांचे रंग खूप बदलले आहेत.