वार्ताहर/ औंध
महाराष्ट्रातील कुस्तीच्या उत्कर्षासाठी व्यावसायिक कुस्ती स्पर्धा अर्थात महाराष्ट्र कुस्ती लीग स्पर्धा पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी अर्जूनवीर काकासाहेब पवार यांनी खासदार शरद पवार यांना साकडे घातले होते. खासदार पवार यांनी राज्यातील कुस्तीच्या विकासासाठी आणि मल्लांच्या हिताकरीता कुस्ती लीग स्पर्धा पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली.
अर्जूनवीर काकासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने नुकतीच खा. शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी विजय काका बराटे, शासकीय कुस्ती कोच शिवाजी कोळी, उद्योजक मोहसीन बागवान, नामदेव बडरे, सतीश पांचाळ, जुनिअर जागतिक विजेता पैलवान महेंद्र गायकवाड उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या जुनियर आशियाई व ज्युनिअर जागतिक कुस्ती स्पर्धेत पुणे येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असलेल्या महेंद्र गायकवाड याने रौप्य पदकांची कमाई केल्याबद्दल शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.