क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची ग्वाही, मैदानाची केली पाहणी
प्रतिनिधी /मोरजी
मोरजी क्रीडा मैदानासाठी असलेल्या काही गैरसोयी लवकरात लवकर सोडवून क्रीडा प्रेमींसाठी सुसज्ज असे मैदान उपलब्ध करून देण्याची ग्वाही क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी मोरजी मैदानाची पाहणी केल्यानंतर दिली. यावेळी त्यांच्या समवेत मांदे आमदार जीत आरोलकर आणि पंच स्वप्नील शेटगावकर माजी पंच प्रकाश शिरोडकर, अनंत शेटगावकर, क्रीडा अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
मोरजी पंचायत क्षेत्रातील क्रीडा मैदानाची गंभीर स्थिती झाली असून या मैदानाची वेळोवेळी दुरुस्ती करावी आणि क्रीडा प्रेमींसाठी हे मैदान लवकरात लवकर उपलब्ध करावे, अशी गेल्या कित्येक वर्षापासून मागणी होती. त्या मागणीला अनुसरून 3 रोजी क्रीडामंत्री गोविंद गावडे आमदार जीत आरोलकर व अधिकाऱयांसोबत पाहणी करून मैदानाची स्थितीबाबत पूर्ण आढावा घेतला.
क्रीडा प्रेमींच्या या मागणीची दखल घेऊन आपण या मैदानांची पाहणी केली आहे. या ठिकाणी सुसज्ज असे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न असतील, असे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.
पेडणे येथील क्रीडा संकुल ताब्यात कधी घेणार ?
पेडणे येथील सावळ वाडा इनडोर स्टेडियमवर सरकारने 34 कोटी रुपये खर्च करून उभारले, मात्र ते मैदान क्रीडा प्रेमींसाठी उपलब्ध करण्याऐवजी परस्पर जीएमआर कंपनीला 18 महिन्यांच्या करारावर भाडेपट्टीवर दिले. ते मैदान परत त्यांना करारानुसार दिले जाईल का असा सवाल पत्रकारांनी केला असता, करारानुसार हे स्टेडियम परत घेऊन नॅशनल स्पर्धेसाठी सज्ज करण्यात येईल असे मंत्री गावडे यांनी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मांदे मतदार संघातील मैदानांची स्थिती सुधारण्यासाठी क्रीडा खात्याअंतर्गत योग्य ती पावले उचलावी त्यासाठी आपण क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांना या मैदानांची पाहणी करण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार त्यांनी आज पाहणी केली आहे. लवकरच मतदार संघातील क्रीडा मैदानांसाठी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास आमदार आरोलकर यांनी व्यक्त केला.