प्रतिनिधी,कोल्हापूर
जिल्ह्यात चैत्राला सुरूवात होताच पारा पस्तिशीकडे झुकला आहे. परिणामी, रात्री उशिरापर्यत उष्मा, पहाटे थंडी अन् दिवसभर उन्हाचा कडाका असे चित्र आहे. सप्ताहभरात चैत्राच्या कडाक्याने व्हायरल इन्फेक्शनच्या रूग्णांत वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, डायरीया, डोळे, डोकेदुखी अन् स्किन इन्फेक्शनचे रूग्ण वाढले आहेत. सध्याचे वातावरण बॅक्टेरियांसाठी पोषक आहे. परिणामी, डासांच्या संख्येत वाढ झाल्याने डेंग्यू, चिकनगुणीयाच्या रूग्णांत वाढ होत आहे. डॉक्टरांनी उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारीत तापमानात बदल झाले. पारा पस्तिशीवर पोहोचला होता. पण त्यानंतर पुन्हा थंडी अन् उन्हाचा सिलसिला सुरू राहिला. आता मार्च संपत आला असताना चैत्राचा कडाका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने पस्तीशी ओलांडत आहे. काही भागात रात्री उशिरापर्यत उष्मा अन् पहाटेला गारठा असे चित्र आहे. पण या बदलत्या हवामानाचा फटका ज्येष्ठांसह चिमुकल्यांनाही बसला आहे. त्यांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम झाला आहे. व्हायरल इन्फेक्शनच्या रूग्णांत यांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.
शहर आणि परिसरासह जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू, इन्फ्लुंएझां, कोरोनाच्या संशयित रूग्णांत वाढ झाली आहे. सर्वसामान्य रूग्णांतही वाढ झाली आहे. प्राधान्याने सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, सांधेदुखीसह डायरीयाची लक्षणे दिसून येत आहेत. वातावरणातील बदलांमुळे डासांची संख्या वाढली आहे. त्यातूनच डेंग्यू, चिकनगुणीयाच्या रूग्णांतही वाढ झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातून शहरात औषध फवारणी सुरू झाली आहे. आरोग्य विभागाने स्वाईन फ्ल्यू, इन्फ्लुंएझां अन् कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सुचना पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.
उष्मा वाढल्याने एअर कुलर, फॅन, अगदी एअर कंडिशनिंगचा वापर वाढला आहे. पण उन्हात बाहेर पडल्यानंतर उष्म्यामुळे शरिरातील पाणी कमी झाल्याने अशक्तपणा, जुलाब, डायरीयाचा त्रास काही जणांना होत आहे. वातावरणात धुळीचे प्रमाण अधिक असल्याने डोळेदुखी, डोळयांची आग होणे, डोळे लाल होणे आदी संसर्गाचे रूग्ण वाढले आहेत. त्वचेला संसर्ग झाल्याने स्किन इन्फेक्शनचे रूग्णही दिसू लागले आहेत. फॅनमुळे अनेकांना सर्दीचा त्रास जाणवत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पाणी साठवल्याने त्यातून डेंग्यूच्या रूग्णांत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात व्हायरल इन्फेक्शन वाढले आहे. पण नियमित इन्फेक्शनच्या लक्षणात ताप वाढतो अन् कायम रहातो. पण सध्या इन्फेक्शन झालेल्यांत ताप कमी असला तरी अशक्तपणा वाढत आहे. व्हायरल इन्फेक्शनसह संसर्गजन्य रूग्णांत वाढ झाल्याने सीपीआर हॉस्पिटलमधील बाह्यारूग्ण विभागात रूग्णांची गर्दी वाढली आहे. खासगी क्लिनिकमध्ये अशा रूग्णांची गर्दी दिसून येत आहे.
व्हायरल न्युमोनियाचा धोका वाढला : डॉ. अनुराग गुप्ता
सीपीआर हॉस्पिटलमधील डॉ. अनुराग गुप्ता म्हणाले, सर्दी, खोकल्याच्या रूग्णांत वाढ झाली आहे. डीहायड्रेशनचे रूग्ण सातत्याने येत आहेत. म्युटंट बदलल्याने व्हायरल रूग्णांना लक्षणे समजून येत नाहीत. त्यामुळे रूग्णांत वाढ झाली आहे. जानेवारी, फेब्रुवारीत गर्दी कमी होती, आता परिक्षांचा हंगाम संपत आला आहे. परिणामी गर्दीत वाढ झाली आहे. संपर्कातून संसर्गात वाढ झाल्याने व्हायरल न्युमोनियाचा धोका आहे. तरी नागरिकांनी गर्दीत मास्कचा वापर करावा, भरपूर पाणी प्यावे, उन्हात अधिक बाहेर पडू नये, आरोग्याची काळजी घ्यावी, कोरोना नियमावलीचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
आहारात पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा
कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. वातावरणात उष्मा वाढला आहे, यापासून संरक्षण होण्यासाठी नियमित आहार घेतला पाहिजे. आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा, डाळी, उसळीचे प्रमाण वाढवावे. नियमित योग, प्राणायाम केल्यास रोगप्रनिकारकशक्ती वाढण्यास मदत होणार आहे, असे योग प्रशिक्षक अंजली डावजेकर यांनी सांगितले.
Related Posts
Add A Comment