यजमान भारताकडून दमदार प्रदर्शनाची अपेक्षा, निखत झरीन, लवलिना बोर्गोहेन यांच्याकडून पदकांची आशा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिलांची विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धा आज गुरुवारपासून येथे सुरू होत असून निखत झरीन व लवलिना बोर्गोहेन यांच्यावर भारतीयांचे लक्ष असेल. जागतिक स्तरावर महिला बॉक्सिंगमध्ये भारताने बरीच उंची गाठली असल्याने त्याला साजेशी कामगिरी करून दाखविण्यासाठी भारतीय पथक सज्ज झाले आहे. ही स्पर्धा होण्याआधी अनेक वादांनी ती गाजली होती.

सहावेळची चॅम्पियन एमसी मेरी कोम डाव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याने वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीन व ऑलिम्पिक कांस्यविजेती लवलिना बोर्गोहेन बारा सदस्यीय भारतीय पथकाचे नेतृत्व करतील. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा जवळ येत असल्याने नव्या वजन गटात खेळताना या दोघीही त्यात जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणारी झरीन याआधी 52 किलो वजन गटात खेळत होती. या गटात खेळताना गेल्या वर्षी तुर्कीत झालेल्या स्पर्धेत तिने चमकदार प्रदर्शन केले होते. पण आता तिने वजन गट कमी केला असून येथील स्पर्धेत ती 50 किलो वजन गटात खेळणार आहे. लवलिनाने मात्र आपला वजन गट वाढविला असून आतापर्यंत ती 69 किलो वेल्टरवेट वजन गटात खेळत होती. पण येथील स्पर्धेत ती 75 किलो मिडलवेट गटातून खेळणार आहे. दोघींचे आधीचे वजन गट 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी रद्द करण्यात आल्याने त्यांनी हा बदल केला आहे.
50 किलो वजन गटातून खेळण्याची निखत झरीनची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत तिने लाईट फ्लायवेट गटातून खेळताना सुवर्ण मिळविले होते. पण बर्मिंगहॅममधील या स्पर्धेत फारसे स्ट्राँग प्रतिस्पर्धी नव्हते. येथील स्पर्धेत मात्र तशी स्थिती असणार नाही. ऑलिम्पिक वजन गट असल्याने निखत झरीनला अव्वल बॉक्सर्सशी मुकाबला करावा लागेल आणि पदक मिळविण्यासाठी तिला संघर्ष करावा लागेल. 75 किलो वजन गटात लवलिनाने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळविले असले तरी ती अद्याप या नव्या वजन गटात रूळण्याचा प्रयत्न करीत आहे. विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोनदा कांस्य जिंकणारी लवलिना ताकद वाढविण्याचा आणि ठोशांमधील पॉवर आणखी वाढविण्यासाठी काम करीत आहे. वरच्या वजन गटात खेळताना यश मिळविण्यासाठी या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. ‘69 किलो वजन गटात खेळताना ज्या प्रतिस्पर्ध्यांशी मुकाबला करावा लागला, त्याहून जादा ताकदीच्या प्रतिस्पर्ध्यांशी 75 किलो वजन गटात मुकाबला करावा लागणार आहे. त्यामुळे पंचेसमधील पॉवर वाढविण्यावर मी जास्त लक्ष केंद्रित केले आहे,’ असे लवलिना म्हणाली.
राष्ट्रकुल चॅम्पियन नितू गंगास (48 किलो), मागील आवृत्तीत कांस्य मिळविणारी मनीषा मौन (57 किलो) यांच्यावरही सर्वांचे लक्ष असेल. याशिवाय साक्षी चौधरी (52 किलो), प्रीती (54 किलो), शशी चोप्रा (63 किलो), सनामाचा चानू (70 किलो) यांच्याकडूनही धक्कादायक निकालाची अपेक्षा आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा भारतात तिसऱयांदा आयोजित केली जात आहे. परंतु बहिष्कारांची मालिका, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटना (आयबीए) व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) यांच्यातील संघर्ष आणि न्यायालयीन खटल्यामुळे या स्पर्धेची चमक थोडी कमी झाली आहे.
आयओसीने शिफारस केल्यानंतरही त्यांच्या विरोधात जाऊन रशियाच्या उमर क्रेमलेव्ह यांच्या अध्यक्षतेखालील आयबीएने रशिया व बेलारुसच्या खेळाडूंना त्यांच्या देशाच्या ध्वजाखाली या स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिल्यामुळे अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड यांच्यासह दहाहून अधिक देशांनी या स्पर्धेतून माघार घेतली. त्यात भर म्हणून या दोन विश्व संघटनांतील संघर्षामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. आयओसी म्हणते की 2024 पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा भरविण्याचा अधिकार आमचा आहे, आयबीएला तो अधिकार नसल्याचे ते म्हणतात. आयबीए ही संघटना 2019 पासून निलंबित आहे. मात्र आयबीएने त्यांना न जुमानता ही स्पर्धा जाहीर केली आणि पात्रता स्पर्धा भरविण्याची घोषणा केली. त्यात महिलांची वर्ल्ड चॅम्पियनशिप ही पात्रतेची प्रमुख स्पर्धा असेल, असे सांगितले.
पात्रता स्पर्धांचे आयोजन आयओसीच करणार असल्याचे क्रेमलेव्ह यांनी मंगळवारी स्पष्ट केले आणि दोन्ही संघटनांनी एकमेकांना सहकार्य करून समन्वय साधण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांनी सर्व पात्रता स्पर्धांचे व्यवस्थापन आयबीए करणार असल्याचेही ठामपणे सांगितले.
भारतातही या स्पर्धेआधी निवडीवरून वाद निर्माण झाला होता. विद्यमान राष्ट्रीय चॅम्पियन मंजू राणी (48 किलो), शिक्षा नरवाल (54 किलो), पूनम पुनिया (60 किलो) यांची बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (बीएफआय) नव्या निवड धोरणानुसार या स्पर्धेसाठी निवड न झाल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
या स्पर्धेची ही 13 वी आवृत्ती असून 65 देशांच्या 300 हून अधिक बॉक्सर्सनी त्यात भाग घेतला आहे. सुवर्णविजेत्याला 1 लाख, रौप्यविजेत्यास 50 हजार आणि कांस्यविजेत्या दोन खेळाडूंना 25 हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे. मागील आवृत्तीत भारताने एका सुवर्णासह तीन पदके मिळविली होती. 2006 मध्ये मायदेशात झालेल्या स्पर्धेत भारताने सर्वोत्तम कामगिरी करताना 4 सुवर्णांसह एकूण 8 पदके पटकावली होती. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा भारताचा यावेळी प्रयत्न असेल.
भारतीय महिला मुष्टियुद्ध पथक ः नितू गंगास (48 किलो), निखत झरीन (50), साक्षी चौधरी (52), प्रीती (54), मनीषा मौन (57), जस्मिन लंबोरिया (60), शशी चोप्रा (63), मंजू बम्बोरिया (66), सनामाचा चानू (70), लवलिना बोर्गोहेन (75), सवीती बोरा (81), नुपूर शेरॉन (81 वरील).