मॉन्टेनीग्रोमध्ये होते अजब स्पर्धेचे आयोजन
जर तुम्हाला केवळ झोपून राहण्यासाठी पैसे मिळत असल्यास तुम्ही अशा प्रकारच्या स्पर्धेत भाग घेणार नाही का? जगात एक अशाप्रकारची स्पर्धा आयोजित होते, ज्यात केवळ झोपण्यासाठी पैसे मिळतात. मॉन्टेनीग्रो या देशातील निकसिक या शहरापासुन काही अंतरावर ब्रेजना नावाचे गाव आहे. या गावात दरवर्षी एक स्पर्धा आयोजित होते, ज्यात लोकांना केवळ झोपायचे असते. जो सर्वाधिक झोपून राहतो, त्याला बक्षीस मिळते. यंदाच्या स्पर्धेत जारको पेजानोविक नावाच्या व्यक्तीने बाजी मारली आहे.

जारकोने पूर्ण 60 तास आडवे होत ही स्पर्धा जिंकली असून याकरता त्याला सुमारे 27 हजार रुपये मिळाले आहेत. ही कामगिरी माझ्यासाठी सोपी होती, याकरता मी वॉर्मअप देखील केले नव्हते असे त्याने थट्टेच्या सुरात म्हटले आहे.
या स्पर्धेत 9 जणांनी भाग घेतला होता, परंतु यातील 7 जणांनी रात्र होताच हार मानत स्पर्धेतून काढता पाय घेतला. स्पर्धेच्या तिसऱया दिवसापर्यंत 2 स्पर्धक तग धरून होते. परंतु अखेरीस जारको यांनी बाजी मारली आहे.

मॉन्टेनीग्रो या देशातील लोक आळशी असतात असे बोलले जात असल्याने ही स्पर्धा थट्टेच्या स्वरुपात सुरू करण्यात आली होती. या स्पर्धेत रोख बक्षीसासह विजेत्याला राफ्टिंग, दोन जणांसाठी रेस्टॉरंटमध्ये लंच अन् 2 दिवसांच्या वास्तव्याची सुविधा देखील दिली जाते. 2021 मध्ये या स्पर्धेत एका महिलेने विजय मिळविला होता. तिने सलग 117 तास म्हणजेच 4 दिवस अन् 21 तास आडवे होत स्पर्धा जिंकली होती. मागील वर्षी या स्पर्धेचे नियम बदलण्यात आले होते. तेव्हा दर 8 तासांनी टॉयलेट ब्रेकवर जाण्याचा नियम तयार करण्यात आला होता. त्यापूर्वी टॉयलेट बेक हा प्रकार नव्हता.