वनडे क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे भारताविरुद्ध सलग 13 व्यांदा पराभूत, चहर, अक्षर, प्रसिद्ध कृष्णाचे प्रत्येकी 3 बळी, धवन-शुभमन गिलची झंझावाती नाबाद अर्धशतके
वृत्तसंस्था /हरारे
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनात भेदक गोलंदाजी साकारणाऱया दीपक चहरची चतुरस्त्र गोलंदाजी, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा यांची समयोचित साथ आणि शिखर धवन, शुभमन गिल यांच्या नाबाद, तडाखेबंद अर्धशतकांच्या बळावर भारताने येथील पहिल्या वनडेत झिम्बाब्वेचा 10 गडी राखून एकतर्फी फडशा पाडला. झिम्बाब्वेचा डाव 40.3 षटकात सर्वबाद 189 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताने 30.5 षटकात बिनबाद 192 धावांसह एकतर्फी विजय संपादन केला आणि या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी सहज आघाडी घेतली.
सलामीवीर शिखर धवनने 113 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 81 धावा फटकावल्या तर शुभमन गिलने 72 चेंडूत जलद, नाबाद 82 धावांचे योगदान दिले. या जोडीने 31 व्या षटकातच एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले.
अडीच महिन्यांच्या ब्रेकनंतर संघात परतत असलेल्या कर्णधार केएल राहुलने धवन-गिल यांचा मोमेंटम बिघडू नये, यासाठी सलामी जोडीत काहीही फेरबदल करणे टाळले आणि ही बाब भारताच्या पथ्यावर पडली. धवन व गिल यांनी शेवटच्या 4 सामन्यातील आपले तिसरे अर्धशतक झळकावले. याशिवाय, विंडीजविरुद्ध मालिकेच्या प्रारंभापासून आतापर्यंत त्यांनी येथे तिसरी शतकी भागीदारीही साकारली.
धवनने सीमर्सविरुद्ध स्क्वेअर कटचे आपले सिग्नेचर फटके लगावत यजमान संघातील गोलंदाजांच्या मर्यादा चव्हाटय़ावर आणल्या. दुसरीकडे, गिलने पहिले 30 चेंडू सावधपणे खेळून काढल्यानंतर जोरदार फटकेबाजीला सुरुवात केली आणि यामुळे भारताला मागे वळून पाहण्याची गरजच भासली नाही. गिलने विकेटच्या दोन्ही बाजूंनी गोलंदाजांचा उत्तम समाचार घेतला. त्याने वेस्लेला डीप मिडविकेटच्या दिशेने फटकावलेला उत्तुंग षटकार वैशिष्टय़पूर्ण ठरला. यादरम्यान, दोन्ही फलंदाजांनी एकत्रित 19 चौकार वसूल केले.
चहरचा भेदक मारा

तत्पूर्वी, हरारे स्पोर्ट्स क्लबच्या ट्रकवरील या सामन्यात स्विंग गोलंदाजीला पोषक वातावरणाचा लाभ घेत दीपक चहरने 27 धावात 3 बळी घेतले. याशिवाय, प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी 3 गडी बाद केले. चहरला सिराजची (1-36) उत्तम साथ लाभली.
वास्तविक, प्रारंभी चहरला सूर सापडण्यासाठी झगडावे लागले. मात्र, पहिला बळी मिळवल्यानंतर त्याने जवळपास प्रत्येक चेंडू जणू बळी घेण्याच्या इराद्यानेच टाकला. त्याच्या गोलंदाजीत बनाना इनस्विंगचे गतवैभव परतले आणि चेंडू उशिराने वळवण्यात यश मिळाल्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांना सातत्याने पेचात टाकण्यात तो यशस्वी ठरला. या महिन्याअखेरीस खेळवल्या जाणाऱया आशिया चषक स्पर्धेसाठी चहर राखीव खेळाडूत व भुवनेश्वर कुमार मुख्य संघात समाविष्ट असला तरी चहरने कामगिरीत सातत्य राखल्यास भविष्यात यात फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे चित्र आहे.
संक्षिप्त धावफलक
झिम्बाब्वे : 40.3 षटकात सर्वबाद 189 (रेगिस चकबवा 51 चेंडूत 4 चौकारांसह 35, ब्रॅड इव्हान्स 29 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह नाबाद 33, रिचर्ड नॅग्रव्हा 42 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 34. अवांतर 25. अक्षर पटेल 7.3 षटकात 3-24, दीपक चहर 7 षटकात 3-27, प्रसिद्ध कृष्णा 8 षटकात 3-50, सिराज 1-36).
भारत : 30.5 षटकात बिनबाद 192 (शिखर धवन 113 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 81, शुभमन गिल 72 चेंडूत 10 चौकार, 1 षटकारासह नाबाद 82. अवांतर 29).
अन् त्या भागीदारीमुळे झिम्बाब्वेचा संघ द्विशतकाच्या उंबरठय़ावर पोहोचला!
ठरावीक अंतराने गडी बाद होत राहिल्याने झिम्बाब्वेची एकवेळ 28.3 षटकात 8 बाद 110 अशी दाणादाण उडाली होती. मात्र, त्यानंतर ब्रॅड इव्हान्स (33) व रिचर्ड नॅग्राव्हा (34) यांनी नवव्या गडय़ासाठी 70 धावांची भागीदारी साकारली व संघाला 189 धावांपर्यंत नेले.
झिम्बाब्वेने 8 गोलंदाज आजमावले, तरीही पाटी कोरीच!
यजमान झिम्बाब्वेने छोटेखानी धावसंख्येचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात 8 गोलंदाज आजमावले. पण, त्यांना धवन व गिल या सलामीवीरांनाही बाद करता आले नाही. यजमान संघातर्फे रिचर्ड नॅग्राव्हा (7 षटकात 0-40), व्हिक्टर (4 षटकात 0-17), ब्रॅड इव्हान्स (3.5 षटकात 0-28), सीन विल्यम्स (5 षटकात 0-28), सिकंदर रझा (6 षटकात 0-32), ल्यूक जाँग्वे (2 षटकात 0-11), वेस्ले मेधवेरे (2 षटकात 0-16), रियान बर्ल (1 षटकात 0-12) असे 8 गोलंदाज आजमावले. तरीही संघाच्या पदरी 10 गडय़ांनी एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला.