पॅराशूटच्या वापरामुळे पायलट सुरक्षित : सुदैवाने जीवितहानी टळली
► वृत्तसंस्था/ चेन्नई
चेन्नईजवळील थंडलम बायपासजवळ उपल्लम परिसरात शुक्रवारी दुपारी भारतीय वायुदलाचे प्रशिक्षण विमान कोसळले. हे एकल आसनी प्रशिक्षण विमान नियमित प्रशिक्षण उ•ाणावर असताना दुपारी 2:50 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. विमान नियंत्रित करणे कठीण होत असल्याचे लक्षात येताच वैमानिकाने ताबडतोब विमानातून बाहेर पडून पॅराशूटच्या मदतीने स्वत:चा बचाव केला. दरम्यान, अपघातानंतर लगेचच वायुदलाने सोशल मीडियावर माहिती शेअर करत तपास पूर्ण झाल्यानंतर कारणे उलगडतील, असे स्पष्ट केले.
विमान कोसळल्यानंतर स्थानिक रहिवासी सर्वात आधी घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनीच जखमी अवस्थेतील पायलटला पाणी पाजून आधार दिला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, पायलट घाबरलेल्या अवस्थेत होता परंतु तो सुदैवाने बचावला. या घटनेची माहिती वायुदलाला दिल्यानंतर सुमारे अर्ध्या तासात वायुदलाचे हेलिकॉप्टर जवळच्या रस्त्यावर उतरले. बचाव पथकाने पायलटला ताबडतोब एअरबेसवर नेत पुढील उपचार सुरू केले आहेत.
वायुदलाकडून निवेदन जारी
भारतीय वायुदलाने या घटनेवर अधिकृत निवेदन दिले आहे. पिलाटस पीसी-7 एमके-2 प्रशिक्षण विमान नियमित मोहिमेवर असताना झालेल्या अपघातात कोणतीही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्यात आल्याचे वायुदलाने सांगितले.
चालू वर्षात अनेक अपघात
चालू वर्षी भारतीय वायुदलाची अनेक विमाने कोसळली आहेत. फेब्रुवारीमध्ये मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे मिराज 2000 प्रशिक्षण विमान कोसळले होते. सुदैवाने दोन्ही पायलट वेळेवर बाहेर पडले होते. जुलैमध्ये राजस्थानातील चुरु जिह्यातील भानुदा गावाजवळ एक जग्वार लढाऊ विमान कोसळल्यामुळे दोन्ही पायलट मृत्युमुखी पडले. त्यापूर्वी मार्चमध्ये अंबाला आणि एप्रिलमध्ये जामनगरजवळ असेच अपघात झाले होते.









