अखिलेश यादवांप्रमाणे तेजस्वींना बसला झटका
वीट बांधून पोहणे जितके अवघड आहे, तितकेच अवघड एखाद्या पक्षासोबत काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढविणे ठरले आहे. 2017 मध्ये उत्तरप्रदेशात अखिलेश यादव यांच्या दारुण पराभवाने ही बाब सिद्ध केली होती आणि आता हीच स्थिती बिहारमध्ये झाली आहे. येथे राजदकडून 62 जागा काँग्रेसने पदरात पाडून घेतल्या होत्या आणि आता तेथे केवळ 4 जागांवर काँग्रेसला विजय मिळू शकला आहे. 2017 मध्ये उत्तरप्रदेश निवडणुकीत काँग्रेसने 100 जागा लढवून केवळ 7 जागांवर यश मिळविले होते. या निकालानंतर काँग्रेससोबत आघाडी करणे समाजवादी पक्षाच्या अंगलट आल्याचे मानले गेले होते.
2014 पासून सातत्याने काँग्रेस विरोधात उभा असल्यास भाजपची कामगिरी बहरते असे दिसून आले आहे. याचबरोबर प्रादेशिक पक्षांच्या विरोधातही काँग्रेस टिकू शकत नसल्याचे चित्र आहे. अशास्थितीत काँग्रेसला अधिक जागा देणे राजदसाठी घातक ठरले आहे. याचबरोबर समन्वय निर्माण न करता आल्याने नुकसान देखील थेट स्वरुपात राजदला झाले आहे.
काँग्रेसला भाकप-मालेने दाखविला आरसा
केवळ 20 जागा लढविणारा डावा पक्ष भाकप-मालेला 7 जागांवर यश मिळाले आहे. अशास्थितीत काँग्रेसने स्वत:च्या पराभवाने महाआघाडीच्या पराभवाचीही पटकथा लिहिली आहे. काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळेच मागील वेळी राजदला बिहारच्या सत्तेपासून मुकावे लागले होते.









