सरूड वार्ताहर
Kolhapur Rain Update : सावे तालुका शाहूवाडी येथील चौगुलेवाडी वस्तीवर वड्यावर नवीन बंधाऱ्याचे काम सुरू असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून बाजूला छोटासा बंधारा बांधला होता.परंतु दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने सदरचा बंधारा पाण्याखाली गेला असून सावेसह ,सावर्डे खुर्द व चौगुलेवाडी गावांचा संपर्क तुटला आहे.
रत्नागिरी महामार्गवरून सावे गावात प्रवेश करताना चौगुलेवाडी गावच्या हद्दीत नवीन पुलाचे काम चालू आहे.सदरचे काम अर्धवट असल्याने सावे गावात ये -जा करण्यासाठी बाजूला सिमेंटच्या पाईप टाकून नवीन बांधा बांधण्यात करण्यात आलेला आहे .दोन दिवस चालू असलेल्या संततधार पावसामुळे या ओढ्याला पाणी आल्या कारणाने सावे गावासह चौगुलेवाडी व सावर्डे खुर्द या ठिकाणी येण्यासाठी संपर्क तुटलेला आहे.पर्यायाने चाकरमानी लोकांसह शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील गैरसोय झाली.
सकाळपासूनच पाण्याची पातळी वाढल्या कारणाने गावात येण्यासाठी रस्ता बंद होता. सावे गावासह पाटणे गावात प्रवेश करताना देखील सखल भागात साठलेल्या पाण्यामुळे पाटणे गावातील संपर्क देखील काही तासांच्या साठी पूर्णपणे बंद होता. कडवी नदीपात्रातून बाहेर आलेले पाणी व संतधर पावसामुळे पाटणे ,सावे ,चौगुलेवाडी ,सावर्डे खुर्द या गावांमध्ये जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने वाहतूक काही काळासाठी बंद होती. पावसाचा जोर कमी येईल त्या पद्धतीने पाण्याची पातळी कमी होत असली तरी वाहतूक पूर्वत होण्यासाठी बराच कालावधी लोटणार आहे. तूर्तास या गावातील वाहतूक व्यवस्था संततधार पावसामुळे कोलमडली आहे.