सावळज/ वार्ताहर
तासगाव तालुक्यातील पुर्व भागातील सावळज व मणेराजुरी परिसरात सकाळी दोन तासाहुन अधिक काळ विमान घिरट्या घालत होते. मात्र कमी उंचीवरून फेऱ्या मारणाऱ्या या विमानाबाबत भागात घबराट होती. तर काहींना मोठी उत्सुकता होती. याविषयी तासगाव तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी मात्र विमान उड्डाणाबाबत तहसील कार्यालयाकडे अधिकृत माहिती नसल्याचे सांगितले आहे.
गुरूवारी सकाळी सुमारे आठ ते दहा वाजेपर्यंत सावळज व मणेराजुरी परिसरात छोटे विमान घिरट्या घालत होते. पांढऱ्या रंगाचे व त्यावर लाल पट्टे असलेले हे विमान ८ ते १० मिनिटांनी फेऱ्या मारीत होते. त्यामुळे विमानाचा आवाज येताच अबालवृद्ध विमान पाहण्यासाठी घराबाहेर पडत होते. विमान पाहुन लहान मुले आनंदीत होत होते. मात्र कमी उंचीवरून अचानक विमान का फिरत असल्याने लोक भयभीत होऊन याबाबत तर्क वितर्क लावत होते. सुमारे दोन तास घिरट्या घातलेल्या या छोट्या विमानाची परिसरात चर्चा सुरू आहे.
तासगाव तहसील कार्यालयाकडे अधिकृत माहितीच नाही
या विमान उड्डाणाबाबत तासगाव तहसील कार्यालयाकडे अधिकृत माहिती नसल्याचे तसेच विमान उड्डाणास परवानगी नसल्याचे तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. मात्र विनापरवानगी सावळज व मणेराजुरी परिसरात विमानाने घिरट्या कशा घातल्या याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
बारामती प्रशिक्षण केंद्रांचे विमान…!
बुधवारी सकाळी ही आटपाडी तालुक्यात ही एका विमानाने घिरट्या घातल्या आहेत. ते विमान बारामती प्रशिक्षण केंद्रांचे शिकावु विमान असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे तेच विमान तासगाव तालुक्यातील पुर्व भागातील सावळज व मणेराजुरी परिसरात घिरट्या घालत असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.