भारतासमोर पुन्हा एकदा दडपण झुगारुन यश खेचून आणण्याचे आव्हान, द. आफ्रिकन संघ मालिकाविजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार
राजकोट / वृत्तसंस्था
यजमान भारतीय संघ आज (शुक्रवार, दि. 17) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात मैदानात उतरेल, त्यावेळी दडपण झुगारुन यश खेचून आणण्यासाठीच हरसंभव प्रयत्न करावे लागणार आहेत. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ सध्या 1-2 फरकाने पिछाडीवर असून स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी संघाला कोणत्याही परिस्थितीत आज विजय प्राप्त करावा लागेल. ही लढत सायंकाळी 7 वाजता खेळवली जाणार आहे.
या मालिकेत नेतृत्वाची धुरा सांभाळत असणारा रिषभ पंत फलंदाजीच्या आघाडीवर अद्याप बराच झगडत असून भारताची हीच मुख्य चिंता ठरत आली आहे. मात्र, विशाखापट्टणममध्ये संपन्न झालेल्या तिसऱया टी-20 सामन्यात बाजी पलटवता आल्याने भारतीय संघ द. आफ्रिकेची आघाडी निम्या प्रमाणात कमी करु शकला. आता आज चौथ्या टी-20 सामन्यात बरोबरी प्राप्त करणे, हे भारताचे मुख्य लक्ष्य असेल.
रिषभ पंत अलीकडील कालावधीत फलंदाजीत बराच झगडत राहिला असून चेंडू हिटिंग झोनमध्ये येत नसल्यास प्रमाणापेक्षा अधिक बाहेर जात त्याला छेडण्याची सवय त्याच्यासाठी मारक ठरत आली आहे. मात्र, यापासून अद्याप काहीही धडे घेण्याची त्याची तयारी दिसत नाही, याचेच अधिक दाखले मिळत आले आहेत.
एरवी पंतला काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये (डीप मिडविकेट ते वाईड लाँगऑनच्या दिशेने) फटकेबाजी करणे आवडते. पण, दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी हीच बाब हेरत वाईड लाईनवर गोलंदाजी करणे शिताफीने टाळले आहे. यापूर्वी, मागील टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाडला उत्तम सूर सापडल्याने आणि इशान किशनने समयोचित साथ दिल्याने भारतीय संघाने ‘इलेक्ट्रिक स्टार्ट’ नोंदवला आणि त्या बळावर वर्चस्व गाजवणे शक्य झाले. आता उर्वरित मालिकेत देखील हीच जोम कायम राखण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहे.
या मालिकेत पाहुण्या संघाने श्रेयस अय्यरला उसळत्या गोलंदाजीच्या माऱयाने बरेच त्रस्त केले असून त्याला या मालिकेत तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरत असतानाही एकही लक्षवेधी खेळी साकारता आलेली नाही. तिसऱया टी-20 मध्ये उत्तम प्रारंभानंतर भारताच्या मध्यफळीने निराशा केली. पण, हार्दिक पंडय़ा संघाच्या मदतीला धावून आला आणि त्यामुळे 180 धावांच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचणे शक्य झाले. आता धावांचा मोमेंटम गमवावा लागू नये, यासाठी भारतीय संघाचे प्रयत्न असतील.
चहल-अक्षरमुळे दिलासा
गोलंदाजीच्या आघाडीवर यजुवेंद्र चहल व अक्षर पटेल यांनी अनुकूल खेळपट्टीचा पुरेपूर लाभ घेत उत्तम मारा केला. त्या पार्श्वभूमीवर, आजही या दोघांकडून संघाला बरीच अपेक्षा असेल. मध्यमगती गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार सातत्य राखत आला असून अवेश खानने फारशा धावा दिलेल्या नाहीत. पण, अद्याप त्याला मालिकेतील पहिल्या बळीची प्रतीक्षा आहे. त्या तुलनेत वैविध्यावर भर देणारा हर्षल पटेल विशाखापट्टणममध्ये विशेष यशस्वी ठरला असून त्याने 58 धावातच 4 बळी घेतले होते.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : रिषभ पंत (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
द. आफ्रिका : तेम्बा बवूमा (कर्णधार), क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), रिझा हेन्ड्रिक्स, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, ऍनरिच नोर्त्झे, वेन पार्नेल, डेव्हॉन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेझ शमसी, ट्रिस्टॅन स्टब्ज, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन.
सामन्याची वेळ : सायं. 7 वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
आफ्रिकन संघासमोर मालिकाविजयाचे लक्ष्य
एकीकडे, भारतीय संघ बरोबरीसाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकन संघ आजच मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल. सध्या द. आफ्रिकन संघ 2-1 फरकाने आघाडीवर असून त्यांना स्टार फलंदाज क्विन्टॉन डी कॉक दुखापतीतून सावरत संघात परतेल, अशी अपेक्षा आहे. डी कॉक मनगटीच्या दुखापतीने त्रस्त असून तो संघात परतल्यास डी कॉक-बवूमा ही जोडी भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरु शकते. या मालिकेत पहिल्या दोन लढतीत सलग विजय संपादन करणाऱया द. आफ्रिकेला तिसऱया सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आज मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
द. आफ्रिकन फिरकीपटू तबरेझ शमसी व केशव महाराज यांनी मागील लढतीत षटकामागे दहापेक्षा अधिक धावांची खैरात केली आहे. केवळ स्पीडस्टार रबाडा सर्वात परिणामकारक गोलंदाज ठरला असून भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीवर अनाठायी धोके पत्करणे टाळले आहेत. धावा रोखण्यातील मैदानी क्षेत्ररक्षणात चमक दाखवली असली तरी झेल सोडण्याचे प्रमाण कमी करण्यावर भर देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
क्विन्टॉन डी कॉकच्या उपलब्धतेविषयी साशंकता
दक्षिण आफ्रिकेचा स्टार सलामीवीर क्विन्टॉन डी कॉक दिल्लीतील सलामी लढतीनंतर या मालिकेत खेळू शकलेला नसून आजच्या लढतीत तो उपलब्ध असेल का, याबाबत अद्याप साशंकता आहे. डी कॉक गुरुवारी नेट्समध्ये हजर होता. मात्र, नोर्त्झेने याबाबत काहीही माहिती देणे टाळले.