दुसरी कसोटी पहिला दिवस : इंग्लंडची 9 बाद 262 धावांपर्यंत मजल
वृत्तसंस्था/ केपटाऊन
येथील न्यूलँड्सवर सुरू झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने 89 षटकांत 9 बाद 262 धावा जमविल्या. त्यात ओली पोपच्या नाबाद अर्धशतकाचा समावेश आहे.
कर्णधार जो रूट व डेन्ली यांनी चांगली सुरुवात केली होती. पण त्यांना मोठय़ा खेळीत त्याचे रूपांतर करता आले नाही. उपाहारानंतर रूटने धावगती वाढविली होती. पण ऍन्रिच नॉर्टच्या एका उसळत्या चेंडूवर डक करताना चेंडू त्याच्या ग्लव्ह्जला लागून यष्टिरक्षकाकडे गेल्यावर डी कॉकने तो टिपत त्याची खेळी संपुष्टात आली. रूटने 49 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 35 धावा जमविल्या. बाद होण्याच्या दोन चेंडूआधी त्याला स्लिपमध्ये रासी व्हान डर डुसेनकडून जीवदानही मिळाले होते. पण त्याचा लाभ रूटला घेता आला नाही. चार वर्षांपूर्वी या मैदानावर 258 धावांची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवणारा बेन स्टोक्स चहापानावेळी 28 तर ओली पोप 5 धावांवर खेळत होते. पहिली कसोटी इंग्लंडने 107 धावांनी गमविली होती. यावेळी त्या संघातील तीन खेळाडूंना त्यांनी वगळले आहे. डेन्लीला स्पिनर केशव महाराजने 38 धावांवर त्रिफळाचीत पेले.
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर झॅक क्रॉली (4) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर उपाहाराआधी डॉम सिबली 34 धावा काढून बाद झाला. त्याने 76 चेंडूत 7 चौकार मारले. दोघेही यष्टिरक्षकाकरवी झेलबाद झाले तर फिलँडर व रबाडा यांनी हे पहिले दोन बळी मिळविले. 21 वर्षीय क्रॉलीची ही दुसरी कसोटी असून जखमी रोरी बर्न्सच्या जागी त्याला या सामन्यात संधी मिळाली आहे. चहापानानंतरच्या सत्रात स्टोक्स व पोप यांनी पाचव्या गडय़ासाठी 58 धावांची भागीदारी केली. पण नंतर ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले आणि दिवसअखेर 9 बाद 262 धावांपर्यंत मजल मारली. स्टोक्स 77 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 47 धावा काढून बाद झाला तर पोप 56 धावांवर नाबाद राहिला. त्याने 132 चेंडूंच्या खेळीत 7 चौकार मारले. बटलर बाद झाल्यानंतर इंग्लंडने 13 धावांत 3 बळी गमविले. द. आफ्रिकेच्या फिलँडर, रबाडा, नॉर्ट, प्रिटोरियस यांनी प्रत्येकी 2 तर केशव महाराजने एक बळी मिळविला.
बर्न्स सकाळी सरावावेळी फुटबॉल खेळताना जखमी झाल्याने इंग्लंडच्या जखमी-आजारी खेळाडूंच्या यादीत आणखी एकाची भर पडली. हाताच्या कोपराला झालेल्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरलाही संघाबाहेर ठेवण्यात आले असून त्याची आणखी तपासणी केली जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव 89 षटकांत 9 बाद 262 : क्रॉली 4, सिबली 34 (76 चेंडूत 7 चौकार), डेन्ली 38 (130 चेंडूत 5 चौकार), रूट 35 (49 चेंडूत 5 चौकार), स्टोक्स 47 (77 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), पोप खेळत आहे 56 (132 चेंडूत 7 चौकार), बटलर 29 (27 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), करन 9, अँडरसन खेळत आहे 3, अवांतर 6. गोलंदाजी : फिलँडर 2-46, रबाडा 2-63, नॉर्ट 2-54, प्रिटोरियस 2-26, महाराज 1-68.