वृत्तसंस्था/ श्रीनगर
केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरला नववर्षाची भेट प्रदान केली आहे. केंद्रशासित प्रदेशात मंगळवारी मध्यरात्रीपासून एसएमएस सेवेवरील बंदी हटविण्यात आली आहे. तसेच सर्व शासकीय रुग्णालयामंधील इंटरनेट सेवा सुरू केली जाणार आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी ही माहिती दिली आहे.
जम्मू-काश्मीरमधील सर्व नेटवर्क तसेच दूरध्वनी सेवा 5 ऑगस्ट रोजी रोखण्यात आली होती. कैदेत असलेल्या नेत्यांच्या मुक्ततेचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार आहे. शासकीय रुग्णालयांसह शाळांमधील ब्रॉडबँड सेवाही लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती कंसल यांनी दिली आहे.
10 डिसेंबर रोजी निवड मोबाईल्ससाठी एसएमएस सेवा सुरू करण्यात आली होती. विद्यार्थी, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे विद्यार्थी, व्यापारी तसेच अन्य लोकांच्या सुविधेकरता ही सेवा सुरू करण्यात आली होती. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून नव्या केंद्रशासित प्रदेशात सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कंसल म्हणाले.
मागील आठवडय़ात लडाखच्या कारगिल जिल्हय़ात मोबाईल इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली होती. कारगिलमध्ये ही सेवा कलम 370 हद्दपार करण्यात आल्यानंतर 145 दिवसांच्या निर्बंधानंतर सुरू करण्यात आली होती. प्रीपेड मोबाईल आणि इंटरनेट सेवा खोऱयात लवकरच सुरू केली जाणार आहे.