चीनचा दावा, समन्वय साधणे आवश्यक
ब्रिक्स परिषदेचे एका वर्षासाठीचे अध्यक्षपद यंदा रशियाला मिळाले आहे. याबद्दल चीनने समाधान व्यक्त केले असून रशिया-चीन भागिदारी जगाच्यादृष्टीने लाभदायक असल्याचे प्रतिपादन केले आहे. रशियाने ब्रिक्सच्या सर्व देशांमध्ये योग्य समन्वय घडवून आणून संघटना बळकट करावी आणि जगाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावावा, अशी अपेक्षाही चीनने व्यक्त केली आहे.
आपल्या अध्यक्षपदाच्या काळात रशिया 150 विविध योजनांच्या माध्यमातून ब्रिक्स देशांमध्ये एकोपा आणि समन्वय आणण्याचा प्रयत्न करणार आहे. रशियातील सेंट पीट्सबर्ग येथे आगामी ब्रिक्स शिखर परिषद जुलैमध्ये होणार आहे. ब्रिक्सचे प्रमुख पाच देश याच ठिकाणी स्वतंत्ररीत्या बैठक करणार आहेत. जी-20 शिखर समिटही सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे नोव्हेंबरमध्ये होत आहे.
आंतरराष्ट्रीय स्थिती किचकट
सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती अत्यंत नाजूक वळणावर असून किचकट बनली आहे. या जटील परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ब्रिक्सची धोरणे महत्त्वाची ठरणार आहेत. अशा आव्हानात्मक काळात रशियाकडे या परिषदेचे अध्यक्षपद येणे लक्षणीय असून रशियावर मोठे उत्तरदायित्व येऊन पडल्याचे मत तज्ञांनीही व्यक्त केले आहे.