दिग्दर्शक मेघना गुलझार यांचा न्यायालयात दावा
सिनेमा सत्यघटनेवर आधारित; मालकी अधिकाराचा प्रश्नच नाही प्रतिज्ञापत्रातून खुलासा
मुंबई / प्रतिनिधी
दीपिका पादुकोणीची प्रमुख भूमिका असलेला ‘छपाक’ चित्रपटाविरोधात मुंबईच न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका ही निव्वळ निर्मात्यांची बदनामी करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूने दाखल करण्यात आली आहे. तसेच चित्रपट हा सत्यघटनेवर आधारीत असल्यामुळे त्यातील कथेवर कुणीही आपला अधिकार सांगूच शकत नाही. त्यामुळे ही याचिका तथ्यहीन असून ती फेटाळून
लावावी, अशी मागणी सिनेमाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शक मेघना गुलझार यांनी मंगळवारी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून केली आहे.
ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या मुलीची कहाणी सांगणाऱया आगामी ‘छपाक’ सिनेमा छपाकची मूळ संकल्पना आणि कथा ही आपलीच असून त्याबाबतची रितसर नोंदणीही इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनकडे (इंपा) करण्यात आली असल्याचे सांगत लेखक राकेश भारती यांनी उच्च न्यायालयात ऍड. अशोक सरोगी यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. ब्लॅक डे या नावाने फेब्रुवारी 2015 मध्येच नोंदणी करण्यात आली होती, असा दावा याचिपेतून करण्यात आला आहे. यावर सिनेमा बनविण्यासाठी अनेक अभिनेते, निर्माते यांच्याकडे चर्चा करण्यात आली होती. यामध्ये फॉक्स स्टार स्टुडिओचाही समावेश होता. मात्र, अनेक अपरिहार्य कारणांमुळे सिनेमाचे काम पुढे जाऊ शकले नाही, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे. मात्र, आता याच पटकथेवर फॉक्स स्टारचा सिनेमा येत आहे. त्यामुळे कंपनीकडे याबाबत आपण तक्रार केली. मात्र, त्यांनी काहीच उत्तर न दिल्यामुळे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याचे असे भारती यांचे म्हणणे आहे. कथा आणि संकल्पना आपलीच असल्यामुळे निर्मात्यांनी
लेखकांच्या यादीमध्ये आपल्यालाही श्रेय द्यावे, अन्यथा सिनेमा प्रदर्शनावर स्थगिती आणावी, अशी मागणीही त्यांनी याचिकेतून केली आहे. आवश्यकता वाटल्यास छपाकची पटकथा आणि माझी पटकथा तज्ञांकडून तपासून घ्यावी, असेही त्यांने याचिकेत नमूद केले होते.
सदर याचिकेवर मंगळवारी न्या. एस. सी. गुप्ते यांच्यापुढे मंगळवारी प्राथमिक सुनावणी पार पडली. तेव्हा याचिकाकर्त्यांचा हा दावा कायद्यात बसणारा नसून निव्वळ सवंग प्रसिद्धीसाठी निर्मात्यांकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने ही याचिका दाखल केल्याचा आरोप करण्यात आला असल्याचे दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी मंगळवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून नमूद केले. त्याची दखल घेत न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली. ‘छपाक’ सिनेमा येत्या शुक्रवारी 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.