पर्यटन महामंडळाचा निर्णय
प्रतिनिधी / ओरोस:
राज्यातील पर्यटन स्थळे व इतर ठिकाणी असलेल्या पर्यटनविषयक खासगी सोयी-सुविधा पुरविणाऱया व्यावसायिकांच्या व्यवसायाची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने प्रसिद्धी व मार्केटिंग केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पर्यटन विकास अधिकारी जगदीश चव्हाण यांनी दिली.
राज्यातील पर्यटन स्थळे व त्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा याची माहिती भारत देशासह जगातील पर्यटकांना व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने www.maharashtratourism.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. याच संकेतस्थळाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हय़ातील तारकर्लीसह सर्व पर्यटन केंदे व तेथील उपलब्ध सुविधा याची माहिती जगभरात पर्यटन विकास महामंडळाने पोहोचविली आहे.
या संकेतस्थळाचा उपयोग आता राज्यातील पर्यटन व्यवसायाशी सबंधित व्यावसायिक यांच्या सेवा-सुविधांची माहिती देण्यासाठी करण्यात येणार आहे. यातून खासगी पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत करण्याचा एमटीडीसीचा प्रयत्न आहे. शासकीय योजना पर्यटनासाठी राबविल्या जात आहेत. त्याचीही प्रचार व प्रसिद्धी या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे. त्याचबरोबर या क्षेत्रातील खासगी व्यवसाय महत्वाचा दुवा असल्याने त्याचीही माहिती देश-विदेशी पर्यटकांना होणे आवश्यक आहे. एमटीडीसीने उपलब्ध केलेल्या सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून या खासगी पर्यटन व्यवसायाचा प्रचार करून येणाऱया पर्यटकांना खासगी सुविधा कुठे व किती प्रमाणात आहेत, याची माहिती व्हावी, यासाठी एमटीडीसीने हा पुढाकार घेतला आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या हॉटेल, निवास व न्याहारी केंदे, महाभ्रमण व्यवस्था, ट्रव्हल ऑपरेटर, पर्यटन गाईड, पर्यटन संस्था यांना याचा फायदा होणार आहे. इच्छुक पर्यटन व्यावसायिकांनी tarkarlimtdc@maharashtratourism.gov.in किंवा oral@maharashtratourism.gov.in या ई-मेल आयडीवर अथवा कार्यालयात प्रत्येक्ष उपस्थित राहून माहिती भरावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.