पाच जुगाऱयांना अटक, 41 हजार रुपये जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
तारिहाळ (ता. बेळगाव) येथे एका मंदिराच्या आवाराजवळ अंदर-बाहर जुगार खेळणाऱ्या पाच जुगाऱ्याना अटक केली आहे. बुधवारी हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
संतोष कल्लाप्पा मुचंडी (वय 28), राजू चंद्राप्पा परमाज (वय 30), मल्लाप्पा गंपाप्पा तळवार (वय 30), ईश्वरलिंग हुल्ल्याप्पा सन्नतम्मण्णवर (वय 24), सिध्दराम नागाप्पा मेलीनमणी (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. यामध्ये एक जण चंदनहोसूर येथील तर चौघे जण तारिहाळ येथील राहणारे आहेत.
बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ असलेल्या सार्वजनिक ठिकाणी अंदर-बाहर जुगार सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अचानक छापा टाकून या पाच जणांना अटक केली. त्याच्या जवळून 41 हजार 80 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या सर्व पाच जणांवर कर्नाटक पोलीस कायदा 87 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.