प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील तिसंगी येथील जंगलमय भागात गावठी हातभट्टीच्या दारू अड्यावर येथील पोलिसांनी रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. धाडीत २ लाख ४० हजार रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
तिसंगी येथे हातभट्टी सुरू असल्याचे कुणकुण लागताच पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचला. पथकात पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम, सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र बुरटे, विक्रम बुरोडकर, निलेश माने, चव्हाण, घाणेकर, पवार, म्हस्के यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
पोलिसांनी गत आठवड्यातच तिसंगी – खोपकरवाडी येथे धाड टाकून तीन लाखांचा ऐवज जप्त केला होता. पुन्हा पोलिसांनी धाडसत्र सुरू केल्याने बेकायदेशीररित्या दारूधंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नजीब इनामदार करत आहेत.