मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांचा पलटवार : वाहतूक बेटासंदर्भात सामंजस्य करार
प्रतिनिधी /मडगाव
नगरसेवक आपणास प्रक्रियेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असले, तरी हेच नगरसेवक प्रक्रियेला बगल देऊन आपली कामे करून घेत असतात, असा दावा मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी पत्रकारांशी बोलताना करून घणाघाती पलटवार केला.
यापूर्वी वाहतूक बेटांवर देखरेख ठेवण्यासाठी कित्येकांना नियमांना बगल देऊन मंजुरी देण्यात आलेली आहे. अशा वेळी सामंजस्य करारही करण्यात आले नव्हते. सध्या पालिका इमारतीनजीकच्या बेटाच्या बाबतीत दिलेली मंजुरी नियम धाब्यावर बसवून देण्यात आल्याचे म्हटले जात असले, तरी त्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आलेला आहे, याकडे मुख्याधिकाऱयांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.
नगरसेवक फायली घेऊन सही घेण्यासाठी आपणाकडे येत असतात तेव्हा त्यांना आपली कृती नियमबाह्य असल्याचे माहीत नसते काय, असा सवाल त्यांनी केला. नगरसेवक स्वतः फायली घेऊन पालिकेत एका विभागातून दुसऱया विभागात जाऊ शकतात काय असा सवाल पत्रकारांनी केला असता कायद्याने हे योग्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
काहींना एका मिनिटात हवी असते फाईलवर सही
काही जण एक दिवसात प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे सांगत असले, तरी असे काही नगरसेवक आहेत ज्यांना एका मिनिटात फाईलवर सही हवी असते, असा गौप्यस्फोट मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी केला. फाईलवर सही न झाल्यास राजकीय हस्तक्षेप होत असतो काय, असे विचारले असता त्यांनी होकारार्थी मान हलविली.
मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी लहानसहान कामे करण्यासाठी नियमांना बगल देणे ही पद्धतीच बनली असून सर्व पालिकांमध्ये ती आढळून येते व राजकीय प्रतिनिधीत्व करणारे त्यासाठी तगादा लावत असतात, असा दावा केला. मात्र ही पद्धती ठोकरून आपण कायद्यानुसार प्रक्रिया राबवून कामे का करत नाहीत असे विचारले असता फर्नांडिस यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
नगरसेवक सगुण नाईक यांनी मात्र मुख्याधिकारी फर्नांडिस य?ांचे मत आपणास मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. एक वेळ चूक झाली म्हणून पुन्हा पुन्हा तेच करण्याऐवजी कायद्यानुसार कामे करणे आवश्यक आहे. अन्यथा नियमबाह्य निर्णय घेऊन अधिकारी पालिका विकण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असे ते म्हणाले.