राहुल बजाज आता असणार ‘चेअरमन एमिरेटस’
नवी दिल्ली
देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या बजाज ऑटोचे चेअरमन राहुल बजाज आपल्या पदावरून पायउतार झाले आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राहुल बजाज यांच्या जागी निरज बजाज हे आता बजाज ऑटोच्या चेअरमनपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. निरज बजाज हे कंपनीचे सध्या कार्यकारी संचालक आहेत. राहुल बजाज हे कंपनीच्या कार्यकारी संचालक आणि चेअरमन पदावरून पायउतार झाले असून 30 एप्रिल 2021 हा या पदांवरील त्यांचा शेवटचा कामकाजाचा दिवस ठरला. आता त्यांची 1 मे 2021 पासून बजाज ऑटोच्या ‘चेअरमन एमेरिटस’ पदावर पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. चेअरमन पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तीला ‘चेअरमन एमिरेटस’ हे पद देण्यात येते. या पदाला चेअरमनपदाचे अधिकार नसले तरी कुटुंबप्रमुखाचा दर्जा आणि मान दिला जातो.