नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर आता पक्षाच्या दिल्ली मुख्यालयातील 50 कर्मचाऱयांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. बाधितांमध्ये सफाई, सुरक्षा कर्मचाऱयांसह प्रसारमाध्यम विभागात कार्यरत असणाऱयांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्वांना सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोणाचीही प्रकृती गंभीर नसली तरी गेल्या दोन-चार दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणीही करण्यात आली. तसेच संपूर्ण कार्यालयाचे सॅनिटायझेशन करण्यात आले असून दररोज आणखी चाचण्या केल्या जात आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक कामांसाठीच कर्मचाऱयांना कार्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारीच कोअर कमिटीची बैठक मुख्यालयात झाली होती. या बैठकीची दुसरी फेरी बुधवारी होणार होती. तथापि, कोरोना संसर्गामुळे ही बैठक अन्यत्र घेण्यात आली. सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या विलगीकरणात आहेत.