वार्ताहर / कुडाळ:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन केलेल्या काही शेतकरी प्रकल्पग्रस्तांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. या प्रकल्पग्रस्तांना हक्काचा मोबदला सात दिवसांत मिळण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी मनसे पदाधिकारी तसेच प्रकल्पग्रस्तांनी कुडाळ प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र, प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नसल्याने 2 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर ‘घंटानाद आंदोलन’ करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 भूसंपादन प्रक्रिया सन 2015 पासून सुरू आहे. काही प्रकल्पग्रस्तांना मोबदला आज-उद्या देऊ, अशी आश्वासने आतापर्यंत देण्यात आली. गेली दोन वर्षे ते प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या हक्काच्या मोबदल्यासाठी लढत आहेत. मनसे पदाधिकाऱयांच्या पुढाकाराने अद्याप मोबदल्यापासून वंचित असलेले प्रकल्पग्रस्त एकवटले. त्यांनी प्रशासनाला निवेदन देत येत्या सात दिवसांत मोबदला मिळाला नाही, तर प्रांताधिकारी कार्यालयासमोर 2 जानेवारी रोजी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आंदोलन करण्यात येणार आहे. नुकसान भरपाई (मोबदला) पासून अद्याप वंचित असलेल्या हायवे प्रकल्पग्रस्तांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले आहे.