प्रतिनिधी / सातारा
मनोहर भोसले याने आपल्याकडे काही दैवीशक्ती असून आपण कॅन्सर बरा करू शकतो असा दावा केला असून त्यावर महाराष्ट्र अंनिसच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे बारामती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती की, गेल्या पाच वर्षाच्या पासून मनोहर भोसले नामक युवकाने बारामती आणि उंदरगाव करमाळा सोलापूर येथे आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा आभास निर्माण करून स्वत:चे आश्रम सुरु केले होते. आपण बाळूमामांचा अवतार असल्याची चर्चा घडवून आणल्यामुळे अनेक लोक आपले असाध्य रोग किंवा आर्थिक आणि कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्याकडे येत असत.
त्यांच्याकडून पाच हजार, अकरा हजार किंवा एकवीस हजार अशा स्वरुपाची पावती फाडली जात असे. त्यानंतर त्यांचे प्रश्न मनोहर भोसले हा इसम त्याच्या दैवी शक्तीने सोडवू शकतो असे सांगून फसवणूक केली जात असे. ह्या प्रकरणी तक्रारदार शशिकांत खरात ह्यांच्या वडिलांना घशाच्या कर्करोगाने ग्रासले असता आजुबाजूच्या लोकांच्या सांगण्यावरून ते मनोहर भोसले ह्याला दाखवले. आपण हा कर्करोग बरा करू शकतो असा दावा मनोहरबाबाने करून शशिकांत खरात यांना चार अमावस्या करण्यास तसेच कर्करोग बरा करण्यासाठी पाण्यातून भंडारा पिणे आणि वरून बाभळीचा पाला लावणे असे अघोरी उपचार सागितले. तसेच शस्त्रक्रिया न करण्याचा देखील सल्ला दिला.
तसेच वडिलांचा कर्करोग विना शस्त्रक्रिया बरा करण्या साठी एक लाख रुपयाचा चढावा ठेवाण्यास देखील सांगितले होते. ह्यातील कुठल्याच गोष्टीचा काहीही उपयोग न झाल्याने शशिकांत खरात यांच्या वडिलांचे शेवटी ऑपरेशन करावे लागले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता तक्रारदार शशिकांत खरात यांनी आपले पैसे परत मागितले. त्यावर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असे तक्रारीत म्हंटले आहे.मनोहर भोसले सोबत इतर दोघांच्यावर देखील जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.