ऑनलाईन टीम / लखनऊ :
हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध करत एका तरुणाने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर आक्षेपार्ह वस्तूंचे ऑनलाईन बुकिंग केले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी गौतम पल्ली पोलिस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल करून ऑनलाईन डिलिव्हरीची ऑर्डर रद्द केली.
आशिष कनौजिया असे योगींच्या पत्यावर ऑनलाईन साहित्य बुकिंग करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
प्रभारी इन्स्पेक्टर चंद्रशेखर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष कनौजिया याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या मेेसेजमध्ये त्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाने त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या पत्त्यावर आक्षेपार्ह सामान बुक केल्याचे सांगितले. पोलिसांनी कनौजियावर गुन्हा दाखल केला असून, त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कनौजिया एका राजकीय पक्षाशी निगडित असल्याचे सांगण्यात येते.