प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत वडगाव जिल्हा आरोग्य खात्याच्या कार्यालय आवारात 10 खाटांचे प्रसूतीगृह उभारण्यात आले आहे. सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याने प्रसूतीगृह सज्ज झाले आहे. इमारतीचे काम पूर्ण होवून तीन महिने लोटले तरी अद्याप याठिकाणी आरोग्य अधिकारी व कर्मचारी आणि आवश्यक साहित्याची जुळणी करण्यात आली नाही. त्यामुळे प्रसूतीगृहाला आरोग्य अधिकाऱयांची प्रतीक्षा आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरवासियांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असून याअंतर्गत स्मार्ट प्रसृतीगृह उभारण्याची तरतूद केली होती. वडगाव येथे 10 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेत निधीची तरतूद करण्यात आली असून इमारत बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. दक्षिण भागात विविध ठिकाणी महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंदे सुरू करण्यात आली होती. यामध्ये दोन ठिकाणी प्रसूतीगृहाचा समावेश होता. पण वैद्यकीय अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली नसल्याने महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंदे बंद करण्यात आली आहेत. होसूर, शहापूर आणि अनगोळ येथे प्रसूतीगृह होते. या ठिकाणी महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.
मात्र महापालिकेने सदर आरोग्य केंदे बंद केली असून, जिल्हा आरोग्य खात्याच्यावतीने प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी प्रसूतीसाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयावरच नागरिकांना अवलंबून रहावे लागते. गरीब नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे महागडे ठरत आहे. सध्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत वडगाव येथे प्रसूतीगृह उभारण्यात आले आहे. या ठिकाणी 10 बेड, ऑपरेशन थिअटर, प्रयोगशाळा आणि आरोग्य अधिकाऱयांना आवश्यक सुविधा, नर्स रुम, स्टाफ रुम आदींसह रुग्णालयात आवश्यक असलेल्या सुविधांसह प्रसूतीगृह सज्ज झाले आहे.
उपनगरात प्राथमिक उपचार सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. पण प्रसूतीगृह उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही विभागात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निधीची तरतूद करून प्रसूतीगृह उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. 10 खाटाचे प्रसूतीगृहाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून याठिकाणी आवश्यक यंत्रोपकरणे उपलब्ध करून वैद्यकीय अधिकारी, नर्सची नियुक्ती करण्याची जबाबदारी आरोग्य खात्याची आहे. कंत्राटदाराने इमारतीचा ताबा आरोग्य खात्याकडे सोपविण्यात आला आहे. पण याठिकाणी रुग्णालय सुरू करण्याच्यादृष्टीने आवश्यक साहित्य उपलब्ध करून आरोग्य अधिकाऱयांची नियुक्ती करण्याची गरज आहे. पण याबाबत आरोग्य खात्याने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे प्रसूतीगृहाची इमारत तयार होवून तीन महिने उलटले तरी अद्याप रुग्णालय सुरू करण्यात आले नाही.