रेल्वे स्टेशनमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांची नाराजी : पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण सध्या प्रगतिपथावर आहे. परंतु यामुळे प्रवाशांना मात्र फटका बसू लागला आहे. पार्किंगच्या ठिकाणी बांधकामाचे साहित्य टाकण्यात आले आहे. सध्या असणाऱया प्रवेशद्वारासमोर वाहने लावण्यास पोलिसांकडून आडकाठी केली जात आहे. त्यामुळे वाहने लावायची कुठे, असा प्रश्न प्रवाशांसमोर आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर हळूहळू रेल्वे रूळावर येऊ लागल्या. लांब पल्ल्याच्या गाडय़ा बेळगाववरून धावत आहेत. लवकरच पॅसेंजर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे प्रवाशांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. अनेक प्रवासी आपली वाहने रेल्वे स्थानकात लावून रेल्वेचा प्रवास करतात. नोकरदार वर्ग रेल्वे स्थानकात सर्वाधिक वाहने लावतात.
पूर्वीच्या पार्किंगच्या ठिकाणी सध्या बांधकामासाठी लागणारे साहित्य टाकण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी रेल्वे स्थानकासमोरील खुल्या जागेत वाहने लावत आहेत. परंतु ही जागा नो पार्किंग झोन असल्याने येथे पार्किंग करू नये यासाठी रेल्वे पोलिसांकडून आडकाठी आणली जात आहे. यामुळे रेल्वे पोलीस व नागरिकांमध्ये दररोज वादावादीचे प्रसंग घडत आहेत. रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱया वाहनांचाही प्रश्न गंभीर झाला आहे.