प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये फक्त ‘कोरोना’वरील उपचार होणार आहेत. त्यादृष्टीने रविवारी सीपीआरमध्ये हालचाली सुरू होत्या. ‘जीवनदायी’तील रूग्णांना याच योजनेतील अन्य खासगी हॉस्पिटलमध्ये †िशफ्ट करण्यात येत असल्याचे समजले. सध्या आयपीडीमध्ये 100 रूग्ण असून त्यातील काहींना घरी पाठवले आहे. त्यामुळे दोन दिवसांत सीपीआर हॉस्पिटल कोरोना उपचारासाठी खुले होणार आहे.
शासनाने शनिवारी जिल्हा रूग्णालयेच कोरोना उपचारासाठी तयार करावीत, असे आदेश काढले हेते. त्यानुसार रविवारी येथील सीपीआर सर्वोपचार रूग्णालयात तयारी सुरू झाली. सीपीआर हॉस्पिटल कोरोना हॉस्पिटल म्हणून विकसित होणार आहे. येथे सद्यस्थितीत कोरोना उपचारासाठी 100 बेडची तयारी केली आहे. त्यादृष्टीने व्हेटिलेटर्स, अतिदक्षता विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. या 650 बेडच्या हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत अंतर्गत रूग्ण विभागात शंभरभर रूग्ण आहेत. त्यातील अधिकतर जीवनदायी योजनेंतर्गत शस्त्रक्रेयेचे आहेत. अशांना जीवनदायी योजनेतील सहभागी खासगी हॉस्पिटल्समध्ये शिफ्ट केले जात आहे.
सीपीआर हॉस्पिटल 650 बेडचे आहे. येथे सुमारे 15 इमारती आहेत. सहा सुसज्ज ऑपरेशन थिएटर, चार अतिदक्षता विभाग, ट्रॉमा केअर विभाग आहे. येथे दोन आर्थोपेडिक, एक महिला, दोन सर्जरी, एक एनआयसीयू, प्रसुती, बर्न, हृदरशस्त्रक्रिया, किडनी स्टोन, नेत्र, कान, नाक, घसा, टीबी आदी वॉर्ड, अपघात विभाग, आपत्कालीन वॉर्ड आहेत, तसेच अतिदक्षता विभागात 40 बेड असून ते व्हेटिलेटर्ससह सुसज्ज आहेत. कोरोना साथीपुर्वी या सर्व वॉर्डमध्ये सुमारे 600 पर्यत रूग्ण असायचे. अंतर्गत विभागात ही स्थिती होती. तर बाहय़ रूग्ण विभागात रोज दीड हजार ते दोन हजार रूग्ण उपचार घेत होते.
जिल्हय़ात कोरोना साथी प्रतिबंधासाठी सीपीआरमध्ये 30 बेडचा कोरोना वॉर्ड सुरू झाला, संशयित रूग्णांना आयसोलेशन हॉस्पिटल येथे आयसोलेटेड करण्यात आले. तरीही कोरोना तपासणीचा अधिकतर भार सीपीआर प्रशासनावर पडला. सीपीआरचे व्यवस्थापन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे आहे. कोरोना साथीशी निगडीत आरोग्य विभागाची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सकांवर आहे. येथे रोज शेकडो संशयितांची तपासणी होत आहे. त्यामुळे सीपीआरमध्येच एकाच छताखाली सर्व सुविधा मिळतील, या उद्देशाने कोरोना हॉस्पिटल करण्याचा निर्णय झाला आहे. ‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचा सुमारे दीड हजार स्टाफ आणि आरोग्य विभागाचा तितकाच स्टाफ आहे. सीपीआरमध्ये संभाव्य शस्त्रक्रिया कोरोना साथीमुळे आठ दिवसांपुर्वी स्थगित केल्या आहेत. अंतर्गत रूग्ण विभागातील अधिकतर रूग्णांना घरी पाठवले आहे. तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक असलेले शंभरभर रूग्ण आहेत. त्यातील अधिकतर महात्मा फुले जीवनदायी योजनेतील आहेत, त्यांच्यावर योजनेत सहभागी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे अशांना खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सुरूवात झाली आहे. दोन दिवसांत कोरोना उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल सज्ज होणार आहे.