दोनवेळा निविदा काढूनही प्रक्रियेला प्रतिसाद नाही : 22 कोटीच्या स्वच्छता कामासाठी केवळ चार पॅकेजद्वारे निविदा
प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या स्वच्छतेचे काम करण्यासाठी महापालिकेकडून निविदा काढण्यात येतात. पण यंदा वीस पॅकेज ऐवजी चार पॅकेज करून 22 कोटीच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. पण दोनवेळा निविदा काढूनही प्रक्रियेला प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे आता प्रशासकांशी चर्चा करून निविदाबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहर आणि उपनगरातील घरोघरी जावून कचरा जमा केला जातो. तसेच गटारी स्वच्छ करणे, रस्त्यांची झाडलोट, नाला स्वच्छता आणि ठिकठिकाणी साचणाऱया कचऱयाची उचल करण्याचे काम कंत्राट पद्धतीने करण्यात येते. यापूर्वी 48 वॉर्डमधील कचऱयाची उचल करण्याचे कंत्राट देण्यात येते. 20 पॅकेज करून निविदा काढून स्वच्छतेचे कंत्राट देण्यात येत होते. पण यंदा केवळ चार पॅपेज करून निविदा मागविण्यात आल्या आहेत.
थंडा प्रतिसाद
स्वच्छतेच्या कामाकरिता 22 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. स्वच्छतेचे कंत्राट देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. पण यामध्ये कंत्राटदारांनी सहभाग घेतला नाही. पहिल्यांदा मागविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद लाभला नाही.
त्यामुळे महापालिका आरोग्य विभागाच्यावतीने दुसऱयांदा निविदा काढण्यात आल्या होत्या. पण दुसऱयांदादेखील एकाही कंत्राटदारांने निविदा दाखल केल्या नाहीत. परिणामी दुसऱयांदाही स्वच्छतेच्या निविदा प्रक्रियेला थंडा प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे याबाबत प्रशासकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. स्वच्छता कंत्राटदारांच्या पॅकेजची संख्या वाढविण्यात येणार की, जुन्याच कंत्राटदारांना मुदतवाढ देण्यात येणार याकडे लक्ष लागले आहे.