अयोध्येतील राममंदिर उभारणीच्या प्रयत्नांना वेग : लवकरच विशेष ट्रस्टची होणार स्थापना
: केंद्रीय तसेच राज्याच्या पथकाचे वारंवार दौरे
वृत्तसंस्था/ अयोध्या
केंद्र सरकार 9 फेब्रुवारीपूर्वी राम मंदिर ट्रस्टची स्थापना करणार आहे. तर 2 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिनी मंदिर उभारणीचे काम सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी रामलल्लाला सकाळी साडेअकरा वाजता 56 प्रकारची फळे-मेवा आणि पक्वानांचा भोग (नैवैद्य) अर्पण करण्यात आल्याची माहिती राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी बुधवारी दिली आहे. श्रीरामलल्ला विराजमान शहराची कक्षा 100 एकर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राम मंदिर उभारणीचे काम लवकरच सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 3 महिन्यांची मुदत लवकरच संपुष्टात येईल. आमच्या रामलल्लाला नवे घर मिळणार आहे. याच आनंदापोटी नववर्षाच्या पहिल्या दिवशी छप्पन भोगचा प्रसाद अर्पण करण्यात आल्याचे दास यांनी म्हटले
आहे.
नववर्षाच्या पहिल्या दिनी रामलल्ला तसेच हनुमानगढी येथे 70 हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावर अयोध्येत दररोज 18 हजार भाविक दाखल होत आहेत. निर्णयापूर्वी ही संख्या 10-12 हजारांदरम्यान होती. दानपेटीतील रक्कमही आता दुप्पट झाली आहे. अयोध्येतील सर्व हॉटेल्स आणि धर्मशाळा दोन दिवसांपूर्वीच भरून गेल्या आहेत.
रामलल्ला विराजमानचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांची भेट घेणार आहे. राम मंदिराची उभारणी लवकर सुरू होऊन देशात सुख-शांतता नांदावी अशी प्रार्थना करणार असल्याचे इक्बाल अंसारी यांनी म्हटले आहे.
श्रीरामलल्ला विराजमान शहराचे नवे स्वरुप, पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारच्या अधिकाऱयांचे पथक वारंवार अयोध्येचा दौरा करत आहे. श्रीरामलल्ला विराजमान शहराची कक्षा 100 एकर राहणार असून लगतची गावे यात जोडली जाणार आहे. तिरुपती आणि व्हॅटिकनच्या धर्तीवर हे शहर विकसित केले जाणार आहे. अयोध्येत 9 प्लॅटफॉर्म असलेले नवे रेल्वेस्थानक निर्माण केले जाणार आहे.
निधीची व्यवस्था
श्रीरामलल्ला शहराच्या पायाभूत विकासाकरता केंद्र सरकार निधी देणार आहे. तर मंदिर उभारणीसाठी रामलल्ला ट्रस्ट जनतेच्या सहकार्यातून निधी उभारणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय मंदिराच्या देखभालीसाठी रक्कम देते. सरकारच्या अर्थसंकल्पातही मंदिरासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली जाऊ शकते.
ऐतिहासिक संदर्भ
नव्या राम मंदिरात जुन्या मंदिराची झलक दिसून येणार आहे. 12 व्या शतकात विक्रमादित्यने अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले होते. या पुरातन मंदिराचे अवशेष उत्खननात सापडले आहेत. फरशीचा हिस्सा अद्याप उपलब्ध आहे. हे पौराणिक अवशेष नव्या राम मंदिरात समाविष्ट असतील.
राम वाटिकेत नवे मंदिर
अयोध्येच्या राम मंदिरात लेझर शोने रामचरित्र मांडले जाणार आहे. परिसरातच संग्रहालय उभारले जाणार असून त्यात मंदिराच्या पौराणिक अवशेषांचे जतन केले जाणार आहे. तर प्रसादालयाच्या राम रसोईमध्ये लंगर चालणार आहे. मंदिर पसिरातच शेषावतार मंदिर उभारण्यात येणार आहे.