महाड प्रतिनिधी
महाड शहराच्या हद्दीत स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई संजय यशवंत जाधव यांच्या विरोधात महाड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात येऊनही अद्याप त्याला अटक केली गेली नाही. पोलीस शिपाई संजय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करून आरोपींना अभय देणाऱ्या पोलिसांबद्दल महाड शहरात नाराजी व्यक्त केली जात आहे.
महाड शहरा पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दादली गावातील स्वामी समर्थ मठात महिला दर्शनासाठी चालत जात असताना पोलिस शिपाई संजय जाधव यांनी या महिलेला रस्त्यामध्ये थांबवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मला फोन कर, नाही तर तुझा फोन नंबर दे अशी धमकी दिली. याप्रकरणी महिलेने महाराष्ट्र पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी पोलीस शिपाई संजय जाधव यांच्या विरोधात कलम ३५४, ३४१, ५०६ यानुसार पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत असे पिडीत महिलेच्या पतीने सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे हे करत आहेत.
महाड पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या संजय जाधव यांच्या गैरवर्तनाबद्दल महाड शहरातील महिलांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. जाधव याचा शहरातील महिलांनी निषेध व्यक्त केला आहे.