युकेमधील गुहेत अद्भूत दृश्य
युनायटेड किंग्डमच्या एका गावात जमिनीखाली रहस्यांनी भरलेली जादुई गुहा आहे. ही गुहा 5 लाख वर्षे जुनी असल्याचे मानले जाते. फारच कमी लोकांनी याच्या आतील भूमिगत चमत्कार पाहिले आहेत. या गुहेत जाण्यासाठी एकमात्र छोटीशी वाट आहे. ही गुहा फ्लिंटशायरच्या नॉर्थ वेल्समधील सिल्केन या छोट्याशा गावात भूमिगत स्वरुपात आहे. ही गुहा शेकडो वर्षापासून लोकांपासून अदृश्य राहिली आहे. 1978 मध्ये नॉर्दर्न पेनिन केविंग क्लबचे सदस्य पहिल्यांदा या गुहेत उतरले होते. तेव्हापासून या गुहेतील अनेक रहस्यमय वाटांचा शोध लावण्यात आला आहे. यामुळे याच्या आतील काही आश्चर्यकारक जागांचाही शोध लागला आहे. या गुहेला ओगोफ हेन फफिनोनौ हे नाव देण्यात आले आहे. हे वेल्श भाषेतील नाव असून याचा इंग्रजीतील अर्थ जुन्या झऱ्यांची गुहा असा होतो. तसेच याला ‘पोचर्स केव’ या नावानेही ओळखले जाते. गुहेच्या आत अडीच लाख वर्षांपूर्वी एक नदी देखील वाहत होती. ही नदी आता कोरडी झाली आहे. याच्या मुख्य मजल्याखाली दुसरा मजला असल्याचे पुरावे आहेत. ही रहस्यांची एक भूमिगत जादुई गुहा असल्याचे उद्गार युनायटेड केवर्स एक्सप्लोरेशन टीमचे सेक्रेटरी इयान अॅडम्स यांनी काढले आहेत.
अनेक प्रकारच्या खनिजांचा साठा
गुहेच्या प्रवेशद्वाराखाली डायर एडिट नावाची एक खाण आहे. तेथे 19 व्या आणि 20 व्या शतकात शिस्याचा शोध घेतला जात होता. गुहेच्या मध्यवर्ती ठिकाणी स्टॅलेग्माइट असून ते खनिज भांडाराच्या वरच्या दिशेने जाणारा ढिग आहे. याची निर्मिती गुहेच्या छतावरून पॅल्शियमयुक्त पाणी मंदगतीने पडत राहिल्याने झाली आहे. गुहेत सागरी जीव लिम्पेटचे जीवाश्म आढळून आले आहेत. हा मानवी डोळ्यांसाठी एक चमत्कारच आहे. याचबरोबर गुहेच्या अनेक हिस्स्यांमध्ये पॅल्शियम नायट्रेट आढळून आले असून याला मून मिल्क म्हटले जात असल्याची माहिती इयान यांनी दिली आहे.