जत प्रतिनिधी
जत तालुक्यातील गुगवाड येथून पश्चिम बंगाल येथे कामावर हजर होण्यासाठी निघालेल्या जवानाचा पुण्याजवळील अपघातात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अरुण साबू गुरव (वय 30, रा. गुगवाड, ता. जत) असे मृत जवानाचे नाव असून बुधवारी (दि.३ मे) पहाटे ही घटना घडली आहे. रात्री उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांनी व गुरव यांच्या नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की,अरुण गुरव हे जत तालुक्यातील गुगवाड येथील रहिवाशी आहेत.ते पश्चिम बंगाल येथे आपले कर्तव्य बजावत होते. त्यांची पत्नी प्रस्तुतीसाठी माहेरी कर्नाटकातील निपाणी येथे होती. मुलगा झाल्याने त्याला पाहण्यासाठी गुरव हे दीड महिन्याच्या रजेवर आले होते. मुलाला पाहून दोन दिवसापूर्वी ते पश्चिम बंगाल येथे कामावर हजर होण्यासाठी निघाले होते.
दरम्यान, पुण्याजवळ त्यांचा अपघात झाल्याने त्यांच्यावर खडकी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे अचानक उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पार्थिवाची शासकीय प्रक्रिया पार पाडून रात्री उशिरा गुगवाड गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते सैन्य दलात ऑडनरी शिपाई पदावर कार्यरत होते. गेली अकरा वर्ष आपली सेवा बजावत होते. या घटनेने गुरव कुटुंबियांवर व गुगवाड गावावर शोककळा पसरली होती.