किमान वेतन द्यावे : अंगणवाडी सेविका अन् मदतनीसांचा ठिय्या
बेळगाव : अंगणवाडी सेविकांना वाढीव वेतन मिळावे, नोकरीत कायम करावे, काँग्रेसने दिलेली सहावी गॅरंटी लागू करावी आदी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी गुरुवारी कोंडुसकोप येथील आंदोलनस्थळी निदर्शने केली. राज्यात 1975 पासून अंगणवाडी ही संकल्पना अमलात आली आहे. तेव्हापासून सेविका आणि मदतनीसांना गौरवधन दिले जाते. मात्र, मागील 48 वषर्तिं केवळ तुटपुंजे गौरवधन दिले जात आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात अंगणवाडी सेविकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना किमान 26 हजार आणि मदतनीसांना 18 हजार वेतन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
गॅरंटी योजनांकडे दुर्लक्ष
अंगणवाडी सेविका नोकरीत कायमस्वरुपी नसल्याने त्यांना निवृत्तीनंतर अडचणी येऊ लागल्या आहेत. काँग्रेस सरकारने निवडणुकीदरम्यान सहाव्या गॅरंटी योजनेत अंगणवाडी सेविकांना निवृत्ती वेतन म्हणून दरमहा 3 हजार रुपये आणि निवृत्तीनंतर 3 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, सरकार सत्तेत येताच या गॅरंटी योजनांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाबाबत निषेध नोंदविण्यात आला. शिवाय तातडीने सहावी गॅरंटी योजना लागू करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.