वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बँकॉक येथे 25 मे ते 2 जून दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकसाठीच्या अंतिम पात्र फेरी स्पर्धेसाठी भारतीय मुष्टीयुद्ध संघाची घोषणा करण्यात आली असून विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अमित पांगलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.
पॅरीस ऑलिम्पिकसाठी यापूर्वी झालेल्या शेवटच्या पात्र फेरीच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांची कामगिरी अत्यंत निकृष्ट झाली आणि त्यांना कोटा पद्धतीनुसार स्थान मिळविता आले नाही. या निकृष्ट कामगिरीनंतर भारतीय मुष्टीयुद्ध संघाचे हाय परफॉर्मन्स संचालक बर्नार्ड ड्युने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. विदेशी प्रशिक्षक डिमिट्री डिमिट्रूक, सी. ए. कुटाप्पा तसेच धर्मेंद्र यादव यांनी 2023 च्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेतील कास्यपदक विजेते दीपक भोरिया (51 किलो), मोहमद हुसामुद्दीन (57 किलो), शिवा थापा (63.5 किलो) आणि विद्यमान राष्ट्रीय विजेता लक्ष्य चहर (80 किलो) यांना वगळण्यात आले आहे. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा अमित पांगलचे संघात पुनरागमन झाले आहे. महिलांच्या विभागात अंकुसिता बोरो (66 किलो) हिचा 60 किलो वजन गटात समावेश करण्यात आला आहे. तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कास्यपदक विजेती जस्मीन लंबोरियाचा पराभव केला. दरम्यान राष्ट्रीय विजेती अरुंधती चौधरीने 66 किलो वजनगटात अव्वल ठरली. 2024 च्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत भारताच्या चार स्पर्धकांनी कोटा पद्धतीनुसार आपली तिकिटे आरक्षित केली आहेत. त्यामध्ये निखात झरीन (50 किलो), परवीन हुडा (57 किलो), लव्हलिना बोर्गोहेन (75 किलो) यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी झालेल्या आशियाई स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करत या महिला मुष्टीयोद्ध्यांनी पॅरीस ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या 9 मुष्टीयोद्ध्यांनी आपला सहभाग दर्शवला होता.
भारतीय मुष्टीयुद्ध संघ- पुरुष- अमित पांगल (51 किलो), सचिन सिवाच ज्यु. (57 किलो), अभिनाश जमवाल (63.5 किलो), निशांत देव (71 किलो), अभिमन्यू लोरा (80 किलो), संजीत (92 किलो), नरेंद्र बेरवाल (92 किलोवरील), महिला – अंकुशिता बोरो (60 किलो), अरुंधती चौधरी (66 किलो).