ग्रंथ महोत्सवासह ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यानी देशाला विकसित करण्याचे महान स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न आपणास पूर्णत्वास न्यावयाचे असल्यास वाचन संस्कृती जोपासली पाहिजे असे प्रतिपादन माजगाव पंचक्रोशी मनविकास ग्रंथालय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी केले. माजगाव पंचक्रोशी मनविकास ग्रंथालय मंडळ आयोजित ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रमात चंद्रकांत सावंत बोलत होते. यावेळी माजगाव माजी उपसरपंच संजय कानसे, शाळा नं १ चे मुख्याध्यापक श्री गुंजाळ, सौ गवस, वाचक अरूण नाईक , लोकेश कानसे, श्री चिरेकर, शितल सावंत, अंगणवाडी सेविका मंजुळा सावंत उपस्थित होते.
यावर्षीच्या वाचन प्रेरणा दिनात विशेष कार्यक्रम म्हणून राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे यांचे ३५९ वे वर्ष शिवराज्याभिषेक उत्सव म्हणून साजरे करण्याचे ठरविल्याने शासनाच्या ‘३५० वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा! उत्सव शिवचरित्रपर पुस्तकांच्या वाचनाचा! या घोषवाक्यानुसार मनविकास ग्रंथालयाने शिवचरित्रपर विविध पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे समीक्षण करुन वाचन केले.
यावेळी माजगाव पंचक्रोशीतील सर्व वयोगटातील वाचकांसाठी या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व शौर्य गाथेची विविध पुस्तके तसेच डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावरील विविध पुस्तके आणि थोर साहित्यिकांच्या विविध साहित्य कृतीं मांडण्यात आली होती.यावेळी सौ. शितल सावंत यांनी वाचन चळवळीचे व वाचन संस्कृतीचे महत्त्व उत्तम वक्तृत्व शैलीत पटवून दिले. या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या ग्रंथपाल मधु कुंभार, लिपिक रोशनी निब्रे, सेविका माया साळगावकर यांनी केले.