यापूर्वीच्या पहिल्या 500 क्रमांकांमध्ये बदल नाही
प्रतिनिधी/ बेंगळूर
उच्च न्यायालयाच्या एकसदस्यिय खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार शनिवारी सीईटीचे सुधारित रँकिंग जाहीर करण्यात आले आहे. कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने 30 जुलै रोजी जाहीर केलेल्या यादीतील आणि आताच्या यादीतील पहिल्या 500 रँकिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही, अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली आहे.
2021 या वर्षात बारावी उत्तीर्ण होऊन यंदाही सीईटी दिलेल्या 24 हजार विद्यार्थ्यांचे बारावीतील 6 टक्के गुण रँकिंगवेळी कपात करण्यात आले आहेत. गुण कपातीनंतर बारावी आणि सीईटीतील 50 टक्के गुण गृहीत धरून सुधारित रँकिंग जाहीर करण्यात आले आहेत. मागील वर्षी बारावी उत्तीर्ण झालेल्या 14 विद्यार्थ्यांनीच 500 ते 1000 पर्यंतच्या रँकिंगमध्ये स्थान मिळविले आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षी बारावी उत्तीर्ण झालेल्या 2,063 विद्यार्थ्यांनी 501 ते 10 हजारपर्यंतच्या सीईटी रँकिंगमध्ये स्थान मिळविले आहे. तर 20,022 विद्यार्थ्यांना 10 हजारानंतरच्या रँकिंगमध्ये स्थान मिळाले आहे.
सदर सुधारित रँकिंग अभियांत्रिकी, कृषी, योगा, नॅच्युरोपॅथी या कोर्सेसासाठी लागू आहेत. वेटर्नरी आणि फार्मसी कोर्ससाठी यापूर्वी दिल्याप्रमाणे सीईटीतील गुण गृहीत धरले जातील, असे स्पष्टीकरण उच्च शिक्षणमंत्र्यांनी दिले.
2021 या वर्षात कोरोना परिस्थितीमुळे बारावीतील विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्यात आले होते. दहावी आणि पदवीपूर्व प्रथम वर्षातील गुणांच्या आधारे या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका तयार करण्यात आली होती. त्या वर्षी सीईटी दिलेलया विद्यार्थ्यांना केवळ सीईटीतील गुणांच्या आधारे रँकिंग देण्यात आले होते. 2021 मध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 24 हजार विद्यार्थ्यांनी यंदाही सीईटी दिली होती. मात्र, त्यांचे बारावीतील गुण रँकिंगसाठी गृहीत धरण्यात आले नव्हते. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने यंदा सीईटी दिलेलया सर्व विद्यार्थ्यांचे बारावीतील 50 टक्के आणि सीईटीतील 50 टक्के गुणांचा विचार करून सुधारित रँकिंग जाहीर करण्याचा आदेश परीक्षा प्राधिकरणाला दिला होता.